" ________ "

घरट्या मधून इतके  दिवस हळूच डोकावणार ते पिल्लू आज सकाळी अचानक फांदीवर आणि फांदीवरून फरशीवर आलं.....डोळे फाडून आबा बघत राहिले...कळेना ह्याला अचानक काय झालंगेले काही दिवस बारीक चिवचिव करताना दिसणारा तो इवलासा जीव...रोज बघत होतेत्याची धांदल आणि त्याच्या आई-बाबांची  ची पण.  नवीन पदार्थ घेऊन चोचीतून भरारी मारत फांदीवर येऊन बसणारी बुलबुल ची मादी आता गेले काही दिवस मोठे किडेनाकतोडे आणून भरवत होती आणि कधी थोडी हिम्मत करून खिडकीजवळ ठेवलेला ब्रेडचा तुकडा सुद्धा...  मस्त चाललं होत बाळ बुलबुल आणि त्याच्या आई-बाबांचं....आणि आज अचानक तो पिसं फुटलेला इवलुसा गोळा आपली छोटी चोच वासून फरशीवर उतरला....काय झालंघरट तुटल कि कायका त्या कावळ्यांनी काही उद्योग केलाय दुष्टपणानेउचलून घेऊया काकाही तरी झालय त्याला...पाणी पाजून पाहूया... तेवढ्यात भिंती वर बसून बोंबाबोंब करणारी आईबाबांची जोडी दिसली. जवळ जाताच जास्तच ओरडा सुरु... आज उडण्याची शिकवणी चालू आहे तर! आई बाबा पैकी एंक उंच उडून दाखवत होता आणि समोरील फांदिभिंतगेट वर बसत होता. एंक जण पिल्ला जवळ जाऊन चिवचिवत करत होता. पिल्लू पंख फुलवत होत आणि जागच्या जागी उडून परत फरशीवर बसत होत... एका क्षणी त्याने पिस फुलवलीझेप घेतली आणि समोरच्या कुंडीच्या कठड्यावर जाऊन तोल सांभाळत बसलं.. आई बाबांचं ओरडा वाढला. मग पुढील काही वेळात कुंडी वरून भिंतभिंती वरून तारतारेवरून  शेजारच्या झाडावर... पिल्लू असच एक एक गड सर करत दिवसभर झेपावत राहील... मग दिसेनासं झालं...आणि त्याचे आईबाबा पण... घरट मागेच राहिल... रिकामं होऊन. 

का कोणास ठाऊक... उगीचच अनेक वर्षांपूर्वीचा प्रसंग आबांना आठवला ... एअरपोर्ट वरून त्याला सोडून परत येताना दाटून आलेला गळा ... टॅक्सी मध्ये मुकं बसून दोघांनी केलेला संवाद ... डोळ्यासमोरून भुर्रकन उडालेले दिवस महिने आणि वर्ष आठवली ... शाळेच्या पहिल्या दिवशीच्या रडारडी पासून ते अगदी युनिव्हर्सिटी, बॅंक लोन आणि व्हिसासाठीचे फॉर्म भरेपर्यंतचे दिवस डोळ्यांच्या कोपऱ्यात सिनेमाच्या ट्रेलर सारखे धावून गेले ... परवा परवा पर्यंत " आलोsss च " असं कोपऱ्यावर जायीपर्यंत ओरडून  सांगणारा त्या उडून जाण्याच्या पवित्र्यात कधी उभा राहिला समजलच नाही... आणि गेला पण भुर्रर्रर्र ... सातासमुद्रापलीकडे.... तीस एक वर्ष झाली... तेंव्हा पण एका बुलबुलला असेच पंख फुटले होते...त्याने पण भारारी घेतली... नवीन विश्वातस्वताच्या... आपण मात्र मागे राहिलो ... रिकामंपण घेऊन. 

"छे!!...पक्षांसारखं जगता आलं पाहिजे" मनातले विचार झटकून टाकत आबा पुटपुटत उठले...फिरायला जाण्यासाठी. बुलबुल नर मादी पण परत येऊन तारेवर बसून चिवचिवत होती ... पिल्लाची वाट न बघता.  

***
प्रकाश केळकर 

Comments

  1. अतिशय सुंदर रचना

    ReplyDelete
  2. म्हणूनच आता या चिमण्यानो परत फिरा रे

    ReplyDelete
  3. उडणाऱ्या पिल्ला ला पुढच आकाश खुणावत असत ,
    मात्र पिल्लू आता बाप झाल्यावर मात्र नाळतूट च्या व्यथे ची जाणीव होते.

    छान लिहिलस प्रकाश

    ReplyDelete
  4. अप्रतिम.. very touching and so true..

    ReplyDelete
  5. Surekh lihilay!! Empty nest syndrome

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog