"मैत्र जीवांचे"
मे महिन्यातील शुक्रवार दुपार. खरंतर लांबलचक उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच्या सुखद हवामान काळातला तो शेवटचा महिना. पण ती दुपार मात्र फार रखरखीत जाणवत होती. कदाचित घराबाहेर न पडता बाहेर चालू असलेल्या परिस्थितीतुन सतत मनात साचलेल्या होरपळीमुळे असेल... कोविड ज्वालामुखीच्या उद्रेकाची झळ दिवसरात्र,चोवीस तास अन् तिन्ही त्रिकाळ शरीर, मन आणि मानसिकतेला विळखा घालून बसलेली. घरातल्या सुरक्षिततेच्या कोषात गुरफटून घेतलं असलं तरी फोन, झूम, नेट,टीव्ही,व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, ई-मेल आणि असंख्य ऑनलाईन मिटिंग मधून बाहेरच्या जगाकडेच सारे कान आणि डोळे लागून राहिलेले... ह्या अश्या डोक्यात अविरत माहिती ओतणाऱ्या सगळ्या माध्यमांपासून थोडा वेळ लांब राहायला फोन बाजूला ठेवून मी डोळे मिटून कोचावर पहुडलो... तेवढ्यात तो वाजलाच. स्क्रिनवरचं नाव पाहताच तात्काळ उचलला ... " नमस्कार. सॉरी शुक्रवारी दुपारी डिस्टर्ब करतोय. पण कामच तसं महत्वाचं आणि अर्जंट आहे... " पलीकडून संदीप, महाराष्ट्र मंडळ दुबई चे अध्यक्ष ... " आरे बोल ना! नो प्रॉब्लेम. मंडळाच्या कामासाठी तुला माहित आहे, केंव्हाही तयार "...
पुढील आर्धा एक तास संदीप बोलत होता. खूप काही सांगत होता. अनेकांच्या कहाण्या ,अनेकांचे आलेले फोन, अनेक मराठी,अमराठी बांधवांनी मदतीसाठी दिलेली हाक... गेले दोन महिने नोकरी नाही ,पगार नाही, अन्नधान्य नाही, जागेच्या भाड्यासाठी, फोनच्या रिचार्ज साठी, पैसे नाहीत ... परत जाण्यासाठी सोय कराल का? विमाने कधी सुरु होतील? स्वस्तात औषध मिळतील का? असे असंख्य प्रश्न विचारणाऱ्या हवालदिल झालेल्या काळजीने पोखरलेल्या जीवांच्या गलबलून टाकणाऱ्या कहाण्या. गेले अनेक दिवस हे ऐकत आणि बघत होतोच. त्याची झळ आता जवळ भासायला लागली होती... महाराष्ट्र मंडळाच्या ह्या परदेशातील माहेरघरातील लोकांना बाहेरच्या आणि घरातल्या दोन्ही लोकांनी मदतीची साद घातली होती... काहीतरी करायला हवं होतं. नुसतेच कार्यक्रम आणि पार्ट्या करण्यापुरत भेटणारं आपलं मंडळ आहे का? असं विचारणाऱ्या जनमानसातील समजूत आणि विचारणा कर्णोपकर्णी कानावर पडत होतीच... त्यामुळे नेहमीसारखी देणगी स्वरूपात मदत मर्यादित न ठेवता आता प्रत्यक्ष कार्यात उडी घेण्याची आत्यंतिक गरज होती... संदीप त्याच्या कार्यकारी समितीच्या वतीने विचार मांडत राहिला आणि नकळत एकीकडे विचारांना चालना मिळत गेली... दुसऱ्याच दिवशी मंडळातील काही ठराविक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा ठरली आणि तो शुक्रवार विचारांच्या भाऊगर्दीत संपला...आपल्याकडे एवढं कार्य करता येण्यासारखं मनुष्यबळ आहे? आणि असलं तरी हे काम सातत्याने करण्यासाठी ते तयार आहे? ह्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी काय काय करता येईल? कायद्याच्या आणि इथल्या नियमावलीच्या चौकटीत हे सारं कसं साधता येईल? एक ना अनेक असंख्य प्रश्न काहूर माजवत होते...आणि त्यावर उहापोह आणि उत्तरे दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत मिळून गेली... एका निर्णयाने , एकमताने ठरलं ... मंडळाने ह्या मदतकार्यात तात्काळ उडी घ्यायची... जे शक्य असेल ते सर्व करण्याच्या उद्देशाने. मंडळाच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली ... कोविड परिस्थीमधील पीडितांना मदतीचा हात आणि दिलासा देण्यासाठी मंडळी सहकुटुंब जमा झाली ...व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. त्याच नामकरण झालं ... " मैत्र जीवाचे".
हो...आपलं काळजी करणारं कोणी जवळ नसताना ,ते सगळे मायदेशी दूर राहत असताना, परदेशात मित्रांचाच मोठा आधार. एकत्र काम करणारे, एका खोलीत ,एका कॅम्प मध्ये राहणारे किंवा एकाच गावातले शहरातले एकाच आवडी-निवडीमधून, कार्यक्रमातून, गाण्या नाटकातून जवळ आलेले आणि लाभलेले मित्रच ह्या परक्या देशात आई वडील भाऊ बहीण आणि जिवाभावाचे आप्त स्वकीय... पण इथे तर स्वतःबरोबर ह्या मित्रांचीही परिस्थिती कोविडने ग्रासलेली ... मग ह्या साऱ्या मित्रांची एकत्र हाक ऐकायला कोणी नवीन मित्र हवेतच. जे धावून येतील, दिलासा देतील, जमेल ती जमेल तशी मदत करतील, चार क्षण आनंदाचे वाटतील... आणि ह्याच भूमिकेतून ही सारी मंडळी जमा झाली. आपली कामे, व्यवसाय, नोकऱ्या, घरदार सांभाळून इतरांचं घर उभं करायला, त्यांवर छप्पर धरायला तयार झाली. आभाळ फाटलं होतं, कुठे कुठे त्याला ठिगळ लावणार, पण मंडळी नेटाने कामाला जुंपली. मंडळाच्या संपर्कयंत्रणेतून संदेश पोचला ... पैशाच्या रूपात यथाशक्ती मदत करण्याचा ... आणि थोड्याच दिवसात रकमेचा आकडा पौर्णिमेच्या भरती सारखा फुगत राहिला. कोणी शंभर कोणी पाचशे कोणी हजार कोणी दोन हजार... मदतीचा स्रोत सुरु झाला... देण्यार्याचे हजारो हात चहुबाजूने अष्टदिशांनी झोळीमध्ये यथाशक्ती आपल्या दानाचे माप टाकत राहिले. पाहता पाहता झोळी जड झाली... गहिवरून टाकणारा आणि अभिमान वाटायला लावणारा हा असामान्य अनुभव...अवर्णनीय!!!
आता ही सारी जमा झालेली पुंजी कोणत्या स्वरूपात गरजुंना पोहोचवावी ह्याचा विचारविनिमय झाला ...कोणालाही रोख रक्कम आजिबात द्यायची नाही ही खूणगाठ तर पक्की केली होती... प्रथम हया साऱ्या रकमेतून अन्नधान्य पुरवठा सुरु झाला. नोकरी गमावलेले बरेच होते ज्यांना दोनवेळा जेवणाची भ्रांत होती.. त्यांच्या घरातील गाडगी मडकी डब्यांनी पार तळ गाठलेला ... मग अश्या आलेल्या सगळ्या विनंत्यांना शिधा पोचता झाला. वेळी अवेळी मदत कार्यातील स्त्रियांनी, ह्या कार्यातल्या आमच्या हिरकणीनी, स्वतः गाडीत शिधावाटपाच्या थैल्या टाकून गरजुं पर्यंत पोचवल्या ... अगदी पार दूरदूरच्या लेबर कॅम्प मध्ये जाऊन. एकीकडे शिधा वाटप चालू होतं आणि दुसरी एक गरज काही जणांकडून कानी आली... पैसे संपल्यामुळे फोनच्या रिचार्जलाही काहींना पैसे नव्हते. मग फोन रिचार्ज करून देण्याचा उपक्रम सुरु झाला... दोन महिन्यात मायदेशातील आपल्या कुटुंबाबरोबर फोन वर बोलू न शकलेले अनेक ख्याली खुशाली च्या देवाणघेवाणीतून ताजेतवाने झाले... त्रस्त भयभीत मनाला दिलासा मिळाला... फोनवरून भेटीचा ओलावा लाभला. उभ्या राहिलेल्या रकमेला योग्य वाटा मिळत होत्या. औषधे उपलब्ध करून देण्यासाठी मंडळातील वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर मित्र पुढे आले. माफक किमतीत औषध मिळण्याची सोय झाली. बाप्पाच्या कृपेने आणि सर्वांच्या सद्भावनेने कार्याच्या ह्या गाडीला गती चालना आणि इंधन अविरत मिळत राहिले. ग्रुप मधील सगळे ह्या एकाच अफाट कर्तव्यभावनेने पछाडले... मदतीसाठी हाक मारणारे सगळे सुखी आणि आनंदी व्हायला हवेत...बास ! ... दिवसभराचे काम संपवून आणि कधी ते करत करतही मध्ये जसा वेळ मिळेल तशी मंडळी मदतकार्यात आकंठ बुडाली...
जुलै महिना उजाडला. दोन अडीच महिने धान्य सामान, औषधे, फोन रिचार्ज, आणि मानसिक आधार आणि धीर देण्यात भराभर संपले. हितचिंतकांकडून सतत मिळणाऱ्या मदतीच्या बळावर हा महायज्ञ अखंड चालूच होता. गेले अनेक महिने येथे अडकून राहिलेल्या बऱ्याच जणांना मायदेशी जाण्याची ओढ होती, गरजही होती. वंदेभारत अभियान चालू झालं पण महाराष्ट्रात विमाने अजून जात नव्हती... पेच उलगडत नव्हता आणि परतीच्या विमानांची व्यवस्था होईल ह्या आशेने शेकडों डोळे त्याकडे अधीरतेने लागून होते. त्यातच चार्टर्ड विमाने पाठवण्याच्या उपक्रमाला काही संस्था आणि व्यक्तींना यश आलं... आणि मैत्र जीवाचे उपक्रमाने या पण कामातही स्वतःला झोकून दिलं. दोन विमाने मंडळाच्या बळावर चार्टर्ड करण्याचं निश्चित केलं. आता तर मोठी लढाई सुरु झाली. व्हाट्सअप आणि ट्विटर वर संदेश पोचताच हजारों च्या संख्येने याचिका दाखल झाल्या... विमाने दोन ठरली होती, एकूण तीन-साडेतीनशे घेऊन जातील एवढी... पण इच्छुक तर हजारावर होते... काय करायचं? ह्या विचारात मंडळी पडली... मार्ग निघाला. प्रत्येक आलेल्या याचिकेला फोन करून त्यांची गरज किती आहे, किती आत्यंतिक आणि तीव्र आहे हे पडताळायचं ठरलं... सारे कामाला लागले... चार पाच दिवसात ह्या सगळ्या हजारो लोकांना फोन वरून संपर्क करण्याचा हा अशक्यप्राय प्रचंड पर्वत ग्रुप मधील सगळ्यांनी लीलया उचलला. प्रत्येकाने पन्नास पन्नास नंबर वाटून घेतले आणि चार दिवसात सगळ्यांना संपर्क करून यादी तयार केली. जेष्ठ नागरिक, वैद्यकीय कारणासाठी जाऊ इच्छिणारे, अडकून राहिलेले टुरिस्ट, नोकरी गेल्याने प्रतिकूल परिस्थितीत असलेले ... अश्या साऱ्यांची आत्यंतिक गरजू लोकांची एक यादी तयार झाली... आता मार्ग सुकर झाला. अनेक स्थानिक प्रथितयश व्यावसायिक, भारतीय कौन्सुलवासाचे अधिकारी, प्रवासी व विमान कंपनी आणि इथल्या तसेच महाराष्ट्रामधील असंख्य लोकांच्या मदतीने दोन विमाने मुंबईला रवाना झाली. मंडळाच्या कार्यात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला. साऱ्या कामाची ,परिश्रमांची इतिश्री झाली.... पाहता पाहता मदत्कार्याची पेटवलेली एक छोटी वात मशाल बनून गेली आणि तिने सत्कार्याचा हा प्रचंड वणवा चेतवाला.
चार महिन्यात ६५० गरजूना शिधा वाटप झालं, ४० लोकांना औषधोपचार आणि डॉक्टर मित्रांकडून समुपदेशन लाभलं, १६ जणांवर संपूर्ण मोफत वैद्यकीय उपचार केले, ४० च्या वर गरजूना आपल्या मायदेशी संपर्क करण्यासाठी मोफत फोन रिचार्ज मिळाला, ३६४ गरजू प्रवासी भारतात चार्टर्ड विमानाने परत जाऊ शकले आणि त्यातील ४० जणांचा संपूर्ण प्रवास खर्च मंडळाने ह्या कार्यातून केला... गेल्या चार महिन्यातील पार पडलेल्या ह्या प्रचंड कार्याकडे मागे वळून पाहता एक कृतकृत्य समाधानी भावना उरात दाटून येईल असं सत्कार्य मंडळाच्या हातून घडून गेलं ... सर्वांच्या एकत्रित सदिच्छा, ऊर्जा, जिव्हाळा, माणुसकी, सामाजिक बांधिलकी, निर्हेतुक कार्याची कळकळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उरात जपलेली दुसऱ्यासाठी झोकून देण्याची सद्वृत्ती ह्या सगळ्यातून घडलेलं, मैत्रभावनेतुन साकार झालेलं प्रचंड कार्य.
"भूतां परस्परे पडो I मैत्र जीवाचे I" ... भूतलावरील सारे एकमेकांचे जिवाभावाचे मित्र होवोत ह्या पसायदानातील ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वनाची पूर्ती अश्या सत्कार्यानेच होईल ह्यात तिळमात्र शंका नाही.... "मैत्र जीवाचे" नावाच्या ह्या अफाट सेतुबंधन कार्यात तन मन आणि धन अर्पून समग्र सहभागी झालेल्या दुबई महाराष्ट्र मंडळातील आमच्या ह्या शिलेदारांच मनापासून अभिनंदन आणि सर्वाना त्रिवार अभिवादन.
***
प्रकाश केळकर
दुबई
Khup chan. I was lucky to be witness to this amazing project executed by the MPFS team. Great teamwork and comittment from each person was very visible. Hats off to the entire MPFS team.
ReplyDeleteअप्रतिम लेखन
ReplyDeleteJabardast Kam ani tevdhech mast lekan. Bravo Prakash and team
ReplyDeleteएका चांगल्या उपक्रमाचे अत्यंत योग्य आणि समर्पक शब्दांकन केलं आहेस
ReplyDeleteसर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन
खरंच मोठे आणि मनाला समाधान देणारे काम!
ReplyDeleteछान
ReplyDeleteखूपच कौतुकास्पद!!
ReplyDelete