विनंती..

काही बातम्या अत्यवस्थ करून जातात. हो! अत्यवस्थ ... कारण अस्वस्थ हा फार कमी प्रभावी शब्द वाटतो हे सांगताना... ह्या अशा बातम्या पाहताना , वाचताना नक्की ह्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही आणि कोणाची कीव करावी हे पण कळत नाही. त्या बातम्या निर्माण ज्यांच्या मुळे झाल्या त्यांची , का त्या आपल्या पर्यंत पोचवणाऱ्यांची, का आपल्या सारख्या वाचक प्रेक्षकांची???

पण एक मात्र नक्की खरं... ह्या घटना आणि विशेष करून त्यातली मानसिक आणि सामाजिक विसंगती संवेदनशील मनाला खटकते आणि त्यावर काही भाष्य करावंसं वाटत. 

असच गेल्या काही आठवड्यातल्या एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं, आणि माझ्या काव्यातून मी माझ्या विचारांना वाट मिळवून दिली... पहा पटतंय का. 

पुन्हा एकदा शेपटी पेटवून 
जाळ ही राजकारणी लंका
जपाबरोबर रोज वाजतोय
तुझी जात शोधायचा डंका... 

वंचित दलित एक म्हणतोय, 
कोणी म्हणे तू ब्राम्हण योगी,
आर्य क्षत्रिय होतास म्हणून
सांगतोय एक असाच भोगी... 

सूर्य गिळणाऱ्या अंजनीसूता,
तुला ह्यांचा राग येत नाहीये?
वज्र हनुमान मारूतराया,
तू काहीच कसं करत नाहीये???

म्हणून... 
हात जोडून एकदा 
विनंती माझी तुला...

पुन्हा एकदा शेपटी पेटवून 
जाळ ही राजकारणी लंका... 
जपाबरोबर रोज वाजतोय
तुझी जात शोधायचा डंका.
***
प्रकाश केळकर 

Comments

  1. पटतय. बरोबर आहे.

    ReplyDelete
  2. धर्म नको, जात नको ,देश ही नको फक्त हवी मानवता .

    ReplyDelete
  3. काव्यातून विदारक सत्य !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog