पाडव्याचा गोडवा ... 

जेवताना अचानक पानात गरम गरम पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार पाहून एकदम कावराबावरा झालो... तर शेजारी हि उभी, प्रसन्न हास्य घेऊन .. माझ्या गोंधळून गेलेल्या चेहेऱ्यावरचा घामाचा थेंब हळूच पदराने टिपत तिने अजून एक झक्कास स्माईल दिलं... आणि माझ्या डोक्यात एकदम लख्ख उजेड पडला... अरे हो!!! उद्या पाडवा नाहीका !!!

आपल्या सणांमध्ये काही प्रथा आहेत.  त्या का आणि कशा पडल्या आणि केंव्हा रुजल्या कोणास ठाऊक...उदाहरणार्थ,  दसऱ्याला गाडी का धुवायची ?, दिवाळीत किल्ला का करायचा? ह्या आणि आश्या अनेक प्रश्नांपैकी पडलेला अजून एक प्रश्न ' पाडव्याला बायकोला किमती वस्तू भेट का द्यायची? आणि तोही दागिनाच, असं का?' ... हा प्रश्न मी एकदा ऐरणी वर आणून पहिलाय, घरात जेवणाच्या टेबल वर चर्चा रंगली होती तेंव्हा.. त्याच उत्तर मला दोन दिवसापूर्वीचा भात आणि त्यावर कोमट झालेली आमटी पानात पडून मिळालं होत. ( ती जागा असे प्रश्न चर्चेला आणण्याची नाही अशी त्यानंतर कायमची खूणगाठ मी बांधली... त्याचा अजून फायदा होतोय). 

सकाळी उटण्याने खरारा करून आंघोळ पार पडली. लाकडाचा सुगंधित भुस्सा छान रंगीबेरंगी वेष्टनांत गुंडाळला कि त्याचं उटणं होतं हे फक्त दिवाळीत कळतं. असो!...  चांगले कपडे घालून हिला घेऊनच बाहेर पडलो...श्रीखंड घेऊन येण्याच्या गोड कामगिरीवर ...(हे अजून एक न सुटलेलं समीकरण. पाडव्याला श्रीखंडच का? ... जाऊदे! मी एकदा हे सगळे प्रश्न गुगलला विचारून पाहणार आहे)... "श्रीखंडा साठी भल्या पहाटे रांग लावावी लागते मिस्टर" दुकानासमोरच्या भल्या मोठ्या रांगेत उभा असलेल्या माझ्या खांद्यावर मित्राचा ओळखीचा हात आणि आवाज एकदम कोसळला.  हातातल्या भरलेल्या स्टील डब्यावर टणटण वाजवत  " आता घरी जाऊन आंघोळ, मग मस्त श्रीखंड चेपून दुपारी निवांत पडणार चार तास" ह्या त्याच्या आगाऊपणाला मी उत्तरादाखल खोचक विचारलं " सकाळी आंघोळ नाही झाली तुझी पाडव्याची ?" आणि त्याने हिच्या कडे पाहत पुढचा बम्पर टाकला " अरे आज बायकोसाठीचा दिवस.तिला महत्व. आधी तिच्या आवडीचं सगळं घ्यायला  हवं...अंघोळ काय नंतर होईलच कि "... का आणि कशाला नको तेंव्हा आगाऊ मित्र भेटतात रस्त्यात देव जाणे!... " मग? काय म्हणतोय तुमचा पाडवा? काय विशेष खरेदी?" त्याचा पुढचा वार!  हा निरर्थक प्रश्न पाडव्याला कोणीतरी हमखास विचारतोच.तेही दुसऱ्याच्या बायकोसमोर ,स्वतःची नाहीये जवळपास ह्याची खात्री करून!...मी उत्तरादाखल उगीच आपला खाकरलो. बायकोच्या चेहऱ्यावर एव्हाना मराठी सीरिअल मधल्या व्हॅम्प सारखे एकापाठोपाठ विविध अविर्भाव उमटले ... तो उगीचच सांत्वनपर माझ्या खांद्यावर परत एकदा थोपटून निघून गेला... तेवढ्यात रांगेत उभ्या लोकांची कुजबुज वाढली म्हणून मी वर पाहिलं.  दुकानावर नोकर पाटी लावत होता " श्रीखंड संपले". 

" काही नवीन डिसाईन्स आली आहेत का ते तरी पाहिलं असतं , उगीच रांगेत उभं राहून वेळ गेला " ... बाजूच्या डायमंड जुवेलरी दुकानाच्या शोकेस मध्ये डोकं घालून हि म्हणाली … " जा कि मग, ये पाहून.लवकर ये. मी पण बघतो तो पर्यंत गुलाबजाम मिळतायत का इथे" मला न समजणारा तिचा इशारा नेहमी प्रमाणे मी असं म्हणून परत एकदा सिद्ध केला. पुन्हा एक मराठी सिरीयल टाईप एक्स्प्रेशन चेहेऱ्यावर ठेवत तिने फायनल डायलॉग फेकला " जाऊदे! नको.चल घरी. मी बघते..रव्याचे लाडू आहेत. तेच घेऊ आज जेवणात". 

सकाळी मी बळेबळेच घेतलेले गुलाबजाम दुपारच्या जेवणात चेपले त्यामुळे वामकुक्षी जरा लांबली... संध्याकाळी ओवाळणीला नेहमी प्रमाणे थोडा उशीर झालाच. त्यांत परत मधेच तिच्या आई चा फोन…   बराच वेळ गेला तयार होण्यात... आणि ओवाळणीच्या तबकात आज परत एखादी नोट मिळण्याचीच अपेक्षा असल्याने थोडा उशीर झाला तरी तिला चालणार होतं... ओवाळायची वेळ आली, तुपाचं चांदीच निरांजन, अक्षता, आंगठी घेऊन तबक सजलं... नाकातली नथ आणि गेल्या पाडव्याला घेतलेली साडी नेसून ( मुद्दामून ??) स्मित हास्य ओवाळणी झाली.  ... नेहमी प्रमाणे खिशात नोटे साठी हात न जाता माझा हात पाठीमागे लपवून ठेवलेल्या सुरेख बॉक्सला घेऊन पुढे आला ... तबकाला तो टेकवून तिच्या पुढे धरल्यावर तिचे डोळे विस्फारले " हे काssss य??" अस म्हणत तिने घाईघाईने तबक बाजूला ठेवलं आणि बॉक्स उघडला... आतल हिऱ्याचं नाजूक नेकलेस चमकलं आणि तिच्या हसतमुख चेहऱ्यावर उजळलं... " आय्य्या ... अरे काय हे? नेकलेस? सर्प्राईस ? हे कधी आणलस? " ... मी काही सांगणार इतक्यात " तरी वाटलंच होतं बरका...तू काही तरी काल पासून लपवतोयस" ... मी हसत हसत म्हणालो...नेहमी सारख... " तुला सगळं माहित असतं ". 

दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणात मसालेभात...  कालचा गरम केलेला ... त्यावर तुप घेणारा माझा हात मधेच थांबवत हि म्हणाली  " वजन कमी करायला झालय तुला... बास तूप " ... आणि माझ्या डोक्यात परत लख्ख उजेड पडला ... अरे हो! आज भाऊबीज नाहीका!!! 

***
प्रकाश केळकर 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog