झेंडा रोविला ...

किल्कनि , आयर्लंड मधल्या त्या छोट्याश्या गावातली मध्यरात्र उलटून गेली होती. सगळी कडे सामसूम आणि थंड शांतता. मधूनच एखाद्या बंद होत आलेल्या पब मधील वाद्यांच्या सुरावटी थंडी बरोबर उडत उडत येत होत्या. रस्त्यावरची शांतता माझ्यासाठी आलेल्या टॅक्सीने भेदली. हम रस्त्यावर पोचलो तो पर्यंत १ वाजला असणार. १० मिनिटात डब्लिन कडे जाणारी बस येथे येईल अस सांगून टॅक्सीवाल्याने मला रस्त्यावरच्या थांब्यावर सोडल. ब्याग ओढत मी फुटपाथ वर विसावलो आणि कोपर्यात आजून एक प्रवासी थांबलेला दिसला… का कोण जाणे…  तो मराठी असणार आशी मजेशीर कल्पना मला  चाटून गेली आणि माझ्या तोंडून नकळत " नमस्कार" उच्चारला गेला...एका क्षणात परतीचा “ नमस्कार” शब्द त्या शांत वातावरणात कानावर आला... त्यानंतरचा डब्लिन पर्यंतचा प्रवास अवर्णनीय होता… डॉ. कुलकर्णी  २० वर्षे किल्कनि मध्ये डॉक्टरकी करतोय… पुण्याला आई वडिलांना भेटायला निघाला होता… आश्या आडगावात आणि आडवेळी मला भेटला आणि तोही एक अस्सल मराठी माणूस!!!…

मौज च्या एका दिवाळी अंकात वाचलेला लेख आठवतो… अन्नपूर्णा तर्खडकर, १९ व्या शतकात विलायतेला शिकायला गेलेली पहिली मराठी मुलगी… आणि आता ? जगाचा एकही काना आणि कोपरा असा नाही जिथे मराठी ऐकू येत नाही... सानफ्रान्सिस्कोच्या बे एरियात तर रस्त्यावर आजूबाजूच्या गाड्यांमध्ये  कोणी दिसलं कि काच खाली करून " मराठी का?" असं आता नाही विचारत  … डायरेक्ट " पुण , मुंबई,नाशिक का इतर कुठले ?" आसाच थेट प्रश्न विचारतात म्हणे... असो! ... तर एकंदर काय मराठी माणूस जगाच्या सगळ्या कोपऱ्यात पोचलंय हे नक्की.

भारतातल्या एका राज्यातील लोकांबद्दल गमतीने नेहमी एक विनोद सांगितला जातो. ती मंडळी इतकी एंटरप्रायसिंग आहेत म्हणे कि निल आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला तेंव्हा त्याला पहिला मानव तिथे पोचल्याचा झालेला आनंद दुसऱ्या क्षणी संपला जेंव्हा पाठीमागून आवाज आला " सर,  क्या मंगता  चाय या कापी "... आता मराठी बांधवांच्या बाबतीत असच काहीसं झालंय... कदाचित काही वर्षातच मंगळावर पहिल्या उतरणाऱ्या मानवाला आता तिथे नाश्त्याला पोहे उपमा थालीपीठ तयार असेल...

पंचवीस एक वर्षांपूर्वी परदेशात पहिल्यांदा जेंव्हा आलो तेंव्हा मराठी शब्द कुठे कानावर पडले कि उत्सुकतेने कान टवकारले जायचे... सुपरमार्केट मध्ये बायको भाजी घेता घेता मोठ्या आवाजात  " तुला भाजीतलं काही कळत नाही. तू घेऊ नकोस" असं नवऱ्याला बिनधास्त म्हणू शकायची... आता तसं नाही राहिलं... एखाद दुसरं मराठी समजणार कोणीतरी आजू बाजूला असतंच. सुपरमार्केटच्या रकान्यांमध्येहि आता खास मराठी पदार्थांचे ब्रँड दिसू लागलेत. पूर्वी वडा पाव,साबुदाणा खिचडी थालीपीठाच मायदेशी सुट्टीत गेल्यावर असणार कौतुकही आता संपलंय...  ती सगळी चविष्ट व्यंजने आता परदेशात कुठेही मिळतात, किंबहुना जास्त चांगली मिळतात ... चितळ्यांची बाकरवडी पुण्यात गेल्यावर रांग लावून घ्यावी लागत नाही... आता ती परदेशी हवाबंद प्याक मध्ये जास्त खुशखुशीत मिळते... सोलापुरी दाण्याच्या चटणी पासून ते हिरव्या हुरड्याचा दाण्यांपर्यंत आणि टेट्रा प्याक मधील पन्ह्या पासून ते कॅन मधील उसाच्या रसा पर्यंत सगळं काही परदेशी मिळतं...

मराठे पेशवाईत अटकेपार पोचले आणि झेंडा लावला … आता मराठी माणूस जगभर पोचलाय... आपली संस्कृती , पदार्थ , भाषा , कला , आणि अस्सल मराठी पण घेऊन.

जय महाराष्ट्र !!!

***
प्रकाश केळकर

Comments

  1. छान , परदेशात मराठी माणसे भेटली की खूप छान वाटते

    ReplyDelete
  2. Global Marathi manus indeed...nice one Prakash!

    ReplyDelete
  3. छानच शब्दांकन .👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog