" विट्टी, मांजा, पतंग, गोट्या … आणि  बरच काही "

मला चांगल आठवतंय …. म्हाद्याला मी आमच्या टीम मध्ये, तब्बल पन्नास बिलोरी आणि दोन मोठ्या पांढर्या हाडक्या गोट्या देण्याच्या बोलीवर उचलला होता.  सगळ कस पूर्वापार चालत आलय हे.  खेळाडूना  बोली लावून विकत घेण्याची प्रथा आगदी पारंपारिक.  हे IPL वगैरे आत्ता आलाय सगळ…. आसो! तर आमची विट्टी दांडू टीम म्हाद्या, सुन्या आणि परश्या सारख्या दिग्गजांमुळे आख्या रेल्वे लाइन इलाक्यात फ़ेमस. दिवस दिवस खेळून दुसर्या टीम ला रडीला आणण्यात पटाईत. टोले हाणत हाणत, आउट न होता, पार मालगाडीच्या यार्डा पलीकडे नेवून परत आमच्या अंगणा पर्यंत आणण्यात हातखंडा असलेली… जबराट टीम…!!!… आंगणात परत आल्यावर शेवटचा  खेळत आलेल्या म्हाद्याचा भीमटोला ठरलेला… विट्टी अलगद  पडणारच जावून देशपांड्यांच्या गच्चित. त्याला कारणाच तस असायचं ना.!! म्हाद्याच्या ठरलेल्या मानधनाच्या व्यतिरिक्त मी त्याला दहा बिलोरी गोट्या एक्स्ट्रा द्यायचो ते उगीच नाहि काही!  गच्चीत नखरेलपणे उभ्या देशपांड्यांच्या सुमी कडे भिरभिरत जावून विट्टी अलगद त्यांच्या गच्चीत पडण्यापूर्वीच माझी दौड ती आण्याला सुरु झालेली असायची.  म्हंजे आमच तसं ठरलेलं होत, माझ आणि म्हाद्याच… एक तरी टोला त्यांन विट्टी गच्चीत पोचवणारा मारायला पाहिजे. त्याशिवाय मी सुमीला जवळून पाहाणार कसा?
 सगळ कस फिक्स असायचं तेंव्हा… आमच्यापण गेम मधे.!!!

हायवे नाक्यावर आण्णा च्या पंचर दुकानात दिवसभर त्याला ट्युबा पाण्यात बुडवायला मदत करून मिळवलेले ट्रकचे बाल्बेरिंग, हि माझी सगळ्यात जमेची बाजू. पांढऱ्या हाड्क्याने चौकोनातल्या गोट्यांचा ठेला उधळणाऱ्या बाकीच्यांना मी हा खास आयटम घेवून आलो कि पोटात कालवायचं. एका वेळी दहा बारा गोट्या चौकोनाच्या बाहेर घेवून मी पडणारच पण चार दोन गोट्यांचे पार फुटून चार तुकडे होणार हे ठरलेल. हे माझ बाल्बेरिंग प्रकरण एकदाच थांबल जेंव्हा पक्या च्या डोळ्याला फुटक्या गोटीचा तुकडा लागला तेंव्हा… त्यादिवसा पासून माझ्या बाल्बेरिंग चा टमटम कायमचा जावून परत माझ्या हातात पांढरा हाडका पडला… आणि  माझ्या गोट्यांच्या खेळाचा कायमचा बल्ल्या झाला… आधी जिंकलेल्या बिलोरि गोट्यांनी भरलेल्या बरणी ने तळ गाठला आणि मी गेम सोडला…. 
देशान एक उमदा खेळाडू गमावला.…!!!

काचा, सरस, रंग, घायपातीचा चिक, काची दोर्याच बंडल, स्वैपाकघरातल जून पातेलं, जुना गंजलेला खलबत्ता, जाळायला काही लकड, चुलीसाठी ३ विटा आणि रिकामी लाकडी मांजा चक्रि… बास … एव्हढ जमल कि कारखान्याच मटेरीअल रेडी असायचं , फक्त दिवस, वेळ आणि ग्यांग ची कमि.  मांजा करायसाठी सगळ्यात महत्वाच म्हणजे गुप्ततेचा अलिखित करार. शेजार गल्ली ला कळलं नाही पायजे  मांजा ला आपण कोणत्या काचा वापरतोय ते. जुनी ट्यूब लाईट म्हणून तर लपवलेली असायची गुप्त ठीकाणी. आगदी आयत्या वेळेला ती कुटायची, इतर सोडा वाटर बाटलीच्या काच तुकड्यांबरोबर.मांजा भारी काची व्हायचा त्यामुळ. … ठरलेल्या दिवशी , म्हंजे साधारण  रविवारी दुपारी घराघरात निजानीज झाल्यावर मांजा  कारखान्याला बत्ती लागायची… हां , पण काचा आधीच कुटून वस्त्रगाळ करून तयार. हे काम मात्र सकाळच्या स्वैपाकाच्या वेळेला धरुन.  आत आईची कुटाकुट आणि त्या आवाजात मिसळून आमची गुप्त काचा कुट… बेमालूम गनिमी कावा!!!… उकळणाऱ्या सरसा च्या रसात रंग आणि काच पूड घालून झाल्यावर कोणी मांजा मधला " सचिन तेंडूलकर" सांगायचा " कबुतराची शिट त्यात घातलं तर आजून चांगला होतोय बघा आपला मांजा " … लगेच पिंपळाच्या कट्ट्यावर चार दोन फ्याक्ट्रि कामगार वर बसलेल्या काबुताराखाली नेम धरून बसणार… . पिंपळाच्या पानात मग त्यांची गळती गोळा करून ती उकळणाऱ्या सरसात पडली कि आनंदी आनंद. … एकीकडून बंडलातून सुटणारा पांढरा दोरा, पातेल्यातल्या मिश्रणातून रंग सरस लेवून बाहेर पडला रे पडला कि कापडाच्या मुठीत धरलेल्या काच पुडीतून धावणार… मग तो वाळणार आणि अलगद चाकरी वर लेपेटून काची मांजा तय्यार… उद्या संध्याकाळी कमीतकमी दहा बारा तरी पतंग काटायची ग्यांग ची स्वप्नं उराशी घेवुन...एका वर्षाच्या सिझनला  व्हरांड्यातलि चालू ट्यूब मांजासाठी काढून घेताना मला आईने पकडलं आणि पुढचे दोन हंगाम आमची फ्याकट्री थंडावली … आणि हळू हळू काची मांजा, कटलेले पतंग आणि इलाक्यातला आमचा दबदबा इतिहास जमा झाला!!!

ते सगळे दिवस आठवत  आता  सध्या मी माझ्या स्मार्ट फोन वर  पतंग, विट्टी दांडू , गोट्या ह्यांचे गेम app शोधतोय… कोणाला माहित असतील तर मला कळवा प्लीज …वाट पाहतोय !!!

--- प्रकाश केळकर 

Comments

  1. Very well described...nostalgic childhood memories for our generation...created strong visuals...keep this going!!!

    ReplyDelete
  2. वा पक्या ,डोळ्यासमोर तो काळ उभा केलास . प्रकाश संतांचा लंपन जणु !!-मंजू काणे

    ReplyDelete
  3. छान लिहिलंय! विटी दांडू मधील पेनल्टी स्ट्रोक आणि लंगडी घालून पिदवणे डोळ्यासमोर आले...

    ReplyDelete
  4. Cherishing memories. Apratim lekhan.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog