*** कोविड डायरीज *** 


मनात आलंय ... भेटून घ्या! 

गेल्या काही वर्षात बरंच काही घडलं आणि गतवर्षात तर बरंच काही बिघडलं. काल व्हाट्सअप चा डीपी आणि स्टेटस बदललेलं दिसलेला आज जगाचाच निरोप घेता झाला आणि रविवारचा जेवून वामकुक्षी साठी पहुडलेला दुपारच्या चहाला न उठता इहलोकी निघून गेला. कोणाचं काही खरं नाही, कधी  वेळ येईल सांगता येत नाही... स्ट्रेस, धावपळ, चिंता, राहणीमान, सवयी आणि आता हा कोविड ...एक ना दोन...  हजारो कारणं.  वेळ कधी सांगून येत नाही आणि जरी ती टाळणं काही अंशी शक्य असेल तरी दुसऱ्याचे हाती ते  बिलकुल  नाही... आपल्या हाती आहे फक्त एकच. मनात येईल तेव्हा भेटत जावं ... उद्या भेट होईल न होईल... मनापासून एखाद्याची भेट घेण्याची आठवण असेल तर नक्की भेटावं ... चार गप्पा माराव्यात... चहा कॉफी किंवा शक्य असल्यास एखादं दुसरं ड्रिंक सोबत घ्यावं ... बास ! एवढं तर नक्की आपल्या हाती आहे... नाही तर फक्त हाती ( आणि मनी ) एकच उरतं ..." छे ! राहून गेलं ! भेटायला हवं होत !!!" ...  

गळाभेटीतली ( हरवलेली) ऊर्जा! 

शेवटची गळाभेट कधी घेतलीय कोणाची? आठवत? नाही आठवणार! कारण गेल्या दीड वर्षात तसं काही तुम्ही नक्की केलं नसणार ... सगळ्या भेटायच्या पद्धतीलाच एक वेगळं वळण लागलय म्हणा!...  मित्राच्या गळ्यात पडून एकमेकांच्या पाठीवर जोरात थाप मारत कडकडून भेटायचे दिवस आता कोरोनाने हिरावून नेले आणि ती सारी भेटीतली ऊब मिटलेल्या मुठी एकमेकांना टेकवत व्यक्त करायचे दिवस फक्त उरले. हस्तांदोलना एवजी कोपराला कोपर टेकवत अभिवादनाची प्रथा चांगलीच रुळायला लागलीय. कोपरापासून नमस्कार करणे ह्या वाक्यप्रकाराला वेगळा चांगला अर्थ लागू झालाय कदाचित. किंवा कोपरखळ्या मारत बोलण्याची कला सर्वांना सहज आत्मसात झालीय बहुतेक. असो!... कडकडून मिठी मारत भेटण्याची ऊर्जाच काही निराळी. मग ती दिवसातून चार वेळा ऑनलाईन विडिओ कॉल करून मिळणं कधीच शक्य नाही आणि व्हाट्सएप वर इमोजी पाठवून तर त्याहून नाही. आता भेटीचे नियम बदलले आणि त्यानुसार मिळणाऱ्या त्या ऊर्जेचे स्रोत पण .. कालाय तस्मय नमः ! 

मास्क मागील ओळख !

जातायेता कोणी हाय हॅल्लो नमस्कार केला तर गोंधळलेल्या मनाने त्याला उत्तर द्यावं लागतं आजकाल. मास्कच्या आड लपलेला अर्ध-अनोळखी चेहेऱ्यांची पूर्ण ओळख पटवून घेई पर्यंत " हा" किंवा "ही" कोण? ह्या सतावणाऱ्या  प्रश्नातला हा गोंधळ... "काय ओळखलं नाही का, विसरलात बहुतेक" हे असं पूर्वीसारखं गोंधळात टाकणारं (आणि उपरोधिक!) वाक्य हल्ली कोणी बोलत नाही. पूर्वी पूर्ण चेहेरा दिसत असून ओळख न पटणारे ( किंवा पटायला नको असलेले ) अनेक भेटायचे आणि मग पाच दहा मिनिटे रस्त्यातच उभं राहून गप्पा मारून आच्छा करून निघाल्यावर पुढील तासभर " कोण बरं हे? काय नाव ह्यांचं?" असा त्रासदायक संभ्रम व्हायचा. आजकाल करोना च्या कृपेने असं होत नाही कारण हनुवटीला दाढीसारखा मास्क लटकावून जाणाऱ्या महाभांगांशिवाय दुसर्या कोणाची ओळख पटत नाही... म्हणूनच कदाचित बरीच मंडळी हनुवटीवर मास्क लावत असतील बाहेर पडताना... शक्य आहे!! हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या..  मी उगीच त्यांच्या सिव्हिक सेन्स ला नाकं मुरडत होतो...असो!  काहीजणांची ओळख डोळ्यातून पटते हे मात्र खरं. आपल्या भेटण्याने  झालेला आनंद त्यांच्या डोळ्यातून ओसंडत असतो. मास्क मागचं त्यांचं स्मितहास्य डोळ्यात चमकत.त्यांची ओळख पटकन पटते...... चेहऱ्यावर दिसणारं खोटं अनौपचारिक हसू आणि खरंखरं मनापासूनचे हसू दोन्ही प्रतिबिंब डोळ्यात स्वच्छ दिसतात ... मस्कमागची हवीहवीशी वाटणारी आपली जिव्हाळ्याची माणसं डोळ्यातून बोलतात आणि कळतात.   

सॅनिटायझरचे दिवस !

 परवा कुठेतरी पूजेच्या तीर्थ प्रसादाला बोलावलं होतं. तसं आजकाल कोणी फारसं बोलावत नाही म्हणा!  सगळीकडे आपलं कसं घरच्या घरी. युट्युब वरच्या भटजी पासून ते व्हर्चुअल तीर्थप्रसादा पर्यंत. ह्या करोना मुळे हि एक चांगली सोय झालीय. एरवी माझी नेहमी एक पंचाईत होते. पूजे समोर नमस्काराला बसलं की पैसे ठेवण्यासाठी पाकिटाकडे हात आपसूक जातो. पाकिटात सुट्टे पैसे नसतात आणि एकच मोठया रकमेची नोट दिसते. ती पूजेसमोर ठेवायची हिम्मत (आणि ऐपत) नसते. ह्या 'टू बी ऑर नॉट टू बी' स्थितीत आपण असताना यजमान तीर्थाचे पळी पंचपात्र धरून शेजारी उभे असतात. त्यांची एक नजर आपल्यावर असते आणि अश्या वेळी काही न ठेवता पाकीट मिटून खिशात ठेवणं म्हणजे.. असो! ... तर परवा त्या पूजेच्या तीर्थ प्रसादाला गेलो. सुदैवानी खिशात चिल्लर होती ती देवापुढे नतमस्तक होत ठेवली आणि तीर्थासाठी हात धरून उभा राहिलो... " अकाल मृत्यू हरणम , सर्व व्याधी विनाशानम,  ..." वगैरे पुटपुटत मी ओंजळ ओठाला लावणार एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचं लक्ष वेधणार्या आवाजात यजमान ओरडले " आहो!!! सॅनिटायझर आहे ... "  मग डोक्यात प्रकाश पडला. मगाशी मी आत आलो तो सरळ पूजेपाशी. सगळे दरवाजातील नियम आणि सोपस्कार न पाळता... " हात धुवायला विसरला असाल म्हणून तीर्था आधी  सॅनिटायझर दिलाय" मास्क पाठून हसत हसत यजमान बोलले...  मी पण माझ ओशाळल हसू मास्कमागे दडवत हातावर हात चोळले आणि त्यावर त्यांनी दिलेल खरंखुरं तीर्थ ओठाला लावलं... अल्कोहोल मिश्रित तीर्थाची चव काही वेगळीच लागते हा मला त्या दिवशी झालेला नवीन साक्षात्कार. ... तर असं आहे एकंदर सगळं. सॅनिटायझर शिवाय दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही ... करोना महाराज की जय !!! 

  ***
प्रकाश केळकर 
जुलै २०२१

Comments

  1. Masta lihilay. Ani tantotant khara aahe! Sagli equations badalali aahet ani tyacha chhan warnan kela aahes Prakash!! Great job!

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय प्रकाश!!!!

    ReplyDelete
  3. प्रकाश, तू नावाजलेल्या लेखका सारखे, लिहितोस. Bravo.

    ReplyDelete
  4. छान लेख प्रकाश!! आशा करू की बिना अल्कोहोल च्या चवीचं तिर्थ लवकरच घेणे शक्य होईल...

    ReplyDelete
  5. Very aptly conveyed the feelings khup chaan

    ReplyDelete
  6. Very aptly conveyed khup chaan

    ReplyDelete
  7. Superb..the facts of present situation very well penned PK

    ReplyDelete
  8. sundar lekh. Manaat alay... bhetun ghyaave he khare!

    ReplyDelete
  9. प्रकाश - खूप छान व्यक्त झालास. लिहित जा!

    ReplyDelete
  10. अगदी तंतोतंत.

    ReplyDelete
  11. अप्रतीम लिहिले आहेस प्रकाश..
    निशब्द व्हायला झाले..

    ReplyDelete
  12. Farach chhan...
    Kityek divasat gadi kadhun laaaambvar bhatkayla ....
    Chalatar...udyacha kahi sangta yet nahi

    ReplyDelete
  13. खरंच किती बदलय सारं! सुंदर लिहलय

    ReplyDelete
  14. खूप छान वर्णन केलंस आजच्या नव्या जीवन पद्धतीचं... मनांत अगदी याच भावना येतात पण त्या तुझ्या ओघावत्या आणि खुसखुशीत भाषेत वाचायला जास्त मजा येते... Keep it up ✒️👏👌🙏🏼

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog