"
परसंतोषे कष्टविली काया ..."
चार्टर्ड विमानांच्या सफल योजनेची कहाणी
"नमस्कार, मी राहुल तुळपुळे बोलतोय. तुमची
फेसबुकवरची पोस्ट पहिली, काहीतरी
करावंसं वाटलं म्हणून लगेच फोन केला. काय
करू शकतो आपण ह्यासाठी एकत्र? "... पलीकडून धनश्री
वाघ बोलत राहिल्या
आणि मी ऐकत
राहिलो. किती वेळ कोण जाणे. बोलताना
त्यांचा दाटून येणार कंठ आणि फोनवर न दिसणारे पण जाणवलेले त्यांचे डबडबलेले डोळे मला
बरंच काही सांगून गेले आणि मी मनोमन हादरून गेलो
... कोविड नावाच्या अचानक कोसळल्या संकटाला
सुरुवात होऊन दोन महिने उलटले होते. त्याचे उलटसुलट पडसाद रोज सकाळ दुपार संध्याकाळ आणि अहोरात्र कानावर आणि डोळ्यावर पडत होतेच. पण त्याचा हा अवतार
मला नवीन होता. धनश्री
बोलत राहिल्या आणि मी ऐकत
राहिलो... इथे ह्या परिस्थितीत अडकलेल्या
अनेकांच्या कहाण्या ... सहज भेट द्यायला आलेले, मुलांकडे
महिना दोन महिने मुक्कामाला आलेले , नोकरीच्या
शोधात आलेले, कामासाठी
आलेले, नोकरी गमावलेले, पैसे
नसलेले, व्हिसा संपलेले, औषधे
संपलेले, दगावलेल्या
आपल्या माणसांच्या अंतिम क्षणी जाऊ न शकलेले, कुटुंब घरादाराची आठवण होऊन व्याकुळ झालेले जेष्ठ, कनिष्ट,
स्त्री, पुरुष, मुले,
विध्यार्थी, मजूर, व्यापारी, प्रवासी,
आजारी... मायदेशी परत
जाण्यासाठी आतुरतेने विमानसेवा सुरु होण्याची वाट
पाहात ह्या परदेशात अडकलेले अनेक
जीव... मी खडबडून जागा झालो. अचानक
ह्या व्हिडिओ आणि
फोनकॉलने मला
माझ्या सुव्यवस्थित सुरक्षित वलयातून बाहेर
आणलं... वास्तवात!!!
मी परिस्थितीची माहिती करून घेण्यासाठी फोन केला पण तासाभरात त्या परिस्थितीचाच मी एक हिस्सा बनून गेलो. . धनश्री
आणि त्यांच्यासारखे इतर
अनेक जण लोकांना धीर देत होते, त्यांच्या
बरोबर बोलून त्यांची आशा जागृत ठेवत होते, त्यांच
मनोबळ वाढवत होते. पण तेव्हड्याने भागणार नव्हतं. तो धीर आणि ते बळ अत्यल्प काळासाठी टिकणार आहे आणि काही
तरी भक्कम कृती करायला हवीय हे मला जाणवलं. मित्र
आप्त व्यावसायिक आणि थोरामोठ्यांच्या माझ्या ओळखीचा इथे
काही उपयोग होईल का? नक्कीच
होईल... विचारांना त्याक्षणी वेग मिळाला. मुंबई
पुण्यामधील माहितीतल्या
राजकीय प्रशासकीय आणि महत्वाच्या क्षेत्रातील व्यक्तींना फोन, ई-मेल, व्हाट्सअप, फेसबुक साऱ्या माध्यमातून संपर्क सुरु झाला... मला
ही विलक्षण स्फूर्ती कोठून आली कोण जाणे. जणू
एक अदृश्य शक्ती मला ते पुरवत होती... माझ्या
कडून काही तरी चांगलं कार्य घडावं म्हणून
ऊर्जा पुरवत होती. आणि
मग पुढील काही दिवस मला ह्या एकाच ध्यासाने
व्यापून टाकलं ... ही सारी माणसं मायदेशी सुखरूप
पोचायला हवीत... लवकरात
लवकर.
भारत सरकारच्या वंदेभारत अंतर्गत विमानसेवा सुरु झाली होती. भारतातील अनेक शहरांकडे रवाना होत होती ... पण ह्या सगळ्यात मुंबई साठी केवळ एकच विमान??? काही हजार लोकं येथून मुंबई ला जाण्यासाठी आतुर असताना? ?काही तरी गोंधळ आहे नक्की... एक आठवडा ह्याच कारण शोधण्यात गेला. असंख्य फोन आणि मेसेजेस मधून सगळ्याचं उत्तर एकच मिळत राहिलं. एकदुसर्याकडे बोटे दाखवत कारण सांगणारं. अकारण काहीतरी गोंधळ होता नक्की. आणि तो माझ्या सारख्या सामान्याच्या आकलनाच्या पलीकडचा होता... वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या एका मित्राकडून शेवटी आशेचा किरण गवसला. काही खाश्या लोकांशी संपर्क करण्यात मला यश मिळालं. साऱ्या गोंधळाचा नीट उलगडा झाला. परवानगीचे कागद हलले नव्हते आणि मुंबईला जाणाऱ्या विमानांना हिरवा कंदील मिळत नव्हता ...हे असे किती दिवस चालेल कोणास ठाऊक पण तोवर ह्या इथल्या लोकांचं काय? त्यांनी कुठे जायचं? मायदेशी कसं पोचायचं ? आणि कधी? ... धनश्री सारखे ह्या लोकांना धीर देणारे अनेक सहकारी आणि त्यांच्या मागे काहीतरी आपल्यासाठी नक्की घडेल ह्या एकाच आशेने डोळे लावून बसलेली शेकडो माणसे माझ्या भोवती अहोरात्र फेर धरून होती...
विचारांच्या आणि मनस्थितीची ह्या
घोगावणाऱ्या धुमसचक्रीत मला एकच उपाय दिसला... चार्टर्ड विमाने केली तर? ... होय
नक्कीच जमेल. खाजगी
विमानांची सोय होऊ शकेल का? तिकिटाचा खर्च किती होईल आणि तो लोकांना
परवडेल का? आणि
सर्वात महत्वाचं म्हणजे ... परवानगी
मिळेल का? ... झपाट्याने
पुन्हा कामाला लागलो. दिल्ली
मुंबई च्या वरिष्ठाना आणि संबंधितांना शेकडो
फोन, उलटसुलट चर्चा, विषय
व गांभीर्य पटवून देणारे फोन आणि अश्या विमानांना परवानगी
मिळावी ह्याचा खटाटोप सुरु झाला... नवीन
मार्ग मिळाला होता, शिखर दिसत होत, निदान
कुठवर मजल मारायचीय हे तरी आता समजलं होत.फक्त कठीण चढाई बाकी
होती, ते शिखर
गाठायची.... मे महिना संपून जून सुरु झाला आणि एका भल्या सकाळी निरोप आला ... सरकार दरबारी परवानगीच्या कागदाची दाखल घेतली होती. संबंधित
खात्याच्या अधिकाऱ्यांनी निरोप
पाठवला होता... " दुबई च्या कॉन्सिलवासात संपर्क करा. त्यांना आम्ही पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत"... मी अत्यानंदाने आरोळी ठोकली
" वा! ये हुई ना बात
!!! अब दिल्ली दूर नही!... और मुंबई भी"
जून महिन्यातल्या त्या
रविवार सकाळी .. नेहमी सारखी तापलेली आर्द्र हवा. दुबईतील भारतीय
कौंसुलावासाच्या बाहेर भली थोरली अजगरासारखी पसरलेली लांब रांग.सगळीकडे कोविडचा दिसणारा ताण , मास्कच्या
मागे लपलेल्या काळजीयुक्त व्याकुळ चेहेर्याचे रांगेतील उभे
भारतीय बांधव, त्यांची
विचारपूस करून त्यांना सल्ला मसलत देणारे अधिकारी... सगळं
चित्रच किती बदललं नाही गेल्या तीन महिन्यात? ह्या
इथेच आपण अनेक कार्यक्रम मिटिंग आणि
भेटीगाठींसाठी कित्येकदा आलो... आणि आज एक वेगळच
कार्य डोक्यात घेऊन... विचारांच्या
तंद्रीतून जागा
होत मी आत पाऊल टाकलं. माननीय
कौंसुल जनरल विपुलजीं बरोबर आधीच
फोन करून वेळ ठरवल्याने भेटीचा मार्ग सुकर होता. किती
आणि काय काय करावं लागत असेल ना ह्या
अधिकारी व्यक्तीला? साऱ्या परदेशातील भारतीयांचा मोठा कर्ता भाऊ. वडीलधारा आधार. ह्सतमुखाने आपल्या
चेंबर मध्ये केलेल्या स्वागताने विपुलजींनि
माझी आर्धी लढाई
जिंकली. एखाद्या उत्तम धन्वन्तर्याला भेटल्यावर रोग्याचा आर्धा
आजार पळून जातो ना, अगदी
तसंच. बरोबर आणलेले १३ जूनच्या मुंबई आणि १४ जूनच्या पुण्याच्या चार्टर्ड विमानासाठी परवानगीचे कागदपत्र
त्यांच्या सुपूर्त केले. त्यांनी
लगेच संमती दर्शवली आणि विमानाचे वेळापत्रक देण्याची विनंती केली. आता
हे कागदपत्र आणि इतर मागितलेली माहितीची छाननी कौन्सुलवासात होणार होती. त्यानंतर
पुढील कारवाई साठी सगळे कागद भारतातील हवाई
वाहतुकीच्या सर्वोच्च
कार्यालयात जाऊन धाडकणार होते. तेथून
पुढील बरेच सोपस्कार, पुन्हा
एकदा छाननी आणि असंख्य ठिकाणी सह्या शिक्क्यांच्या प्रवासात
अनेक टेबलावरुन फिरणार
होते... ह्या सगळ्याला किती आणि कसा वेळ लागेल ह्या चिंतेने मला पछाडले... विमानांची
आतुरतेने वाट पाहणाऱ्या हजारोंचे
व्याकुळ चेहेरे माझ्या डोळ्यासमोर तरळले... भारतीय आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या मंत्रालयाच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्याकडून मला परवानगीचे काम
तात्काळ होईल ह्याची हमी मिळालेली होतीच. आणि
त्याच्या जोडीला विपुलजींनी
पण लवकर काम करण्याचं दिलेलं आश्वासन घेऊन आणि त्यांच्या कडून मिळालेली सकारात्मक ऊर्जा घेऊन मी दुप्पट
उत्साहात बाहेर
पडलो. आता मला माझ्या सहकार्यांना आणि
हजारो लोकांना सांगायला , त्यांचा
धीर वाढवायला अजून
एक पायरी पार केल्याची बातमी होती... गाडीमध्ये
बसून ट्विटर, फेसबुक
आणि व्हाट्सअप ग्रुप वर त्याचे
अपडेट टाकून मी अनेकांची
सकाळ प्रसन्न केली आणि माझ्या ऑफिसच्या मार्गाला लागलो.
संध्याकाळ पर्यंत आलेली विमानाची माहिती रात्री उशिरा विपुलजींना पाठवली... आता खरा कसोटीचा काळ
सुरु होता. परवानगी
येई पर्यंतचा, वाट
पाहात राहायचा सगळ्यात कठीण काळ. अनेकांचे
मेसेज आणि फोन आता स्वीकारायचे होते.
परवानगी मिळेपर्यंत त्यांना धीराने उत्तर देण्यासाठी मी सज्ज
होतो. आता त्या कृष्णविवरात, अनिश्चिततेच्या उदरात, काही दिवस तरी मला राहायचा होतं , सगळ्यांना
सांभाळत... तो आनंदाचा क्षण लवकर यावा ह्याची प्रार्थना करत.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी... साधारण
८ च्या सुमारास विपुलजींकडून आलेला मेसेज माझ्या फोनवर झळकला.
अधीरतेने मी तो
उघडला मात्र, जागच्या
जागी शहारलो. आचंबित अत्यानंदाने तोंडून शब्द
फुटेना की विस्फारलेले
डोळेही मिटेना ...परवानगी मिळाली होती... होय!
दोन्ही चार्टर्ड विमानांना संपूर्ण
परवानगी मिळाली होती.
चोवीस तासाच्या आत सर्व
राज्य केंद्रीय सरकार दरबारी आणि कौन्सिलवासातून सगळे कागदपत्र भराभर हलून परवानगी मिळाली होती... आमच्या
साऱ्यांच्या गेल्या
काही दिवसातल्या प्रचंड मेहनतीचं चीज झालं होतं... दोन
विमानातून जवळ जवळ तीन साडेतीनशे माणसं मायदेशी जाणार
होती... न भूतो न भविष्यती अशी ही बेफाट
बातमी वाचून माझ्या
डोळ्यातून अश्रूना वाट फुटली... अनेकांच्या
आशेच्या बळावर
मिळवलेल्या फलिताचे
ते आनंदाश्रू होते.... आधी
मला सगळ्या माझ्या हजारो लोकांना हे सांगायच होत. पुन्हा
एकदा ट्विटर च्या माध्यमातून हा आनंदाचा
चिवचिवाट करायला मी फोन
उचलला. मला माहित होत, इथून
पुढे आता खरी कामगीरी... मी पुन्हा एकदा सज्ज झालो. एका
वेगळ्याच उत्साहाने.
पुढचे काही दिवस झपाटल्यासारखे होते. अंगात
संचारल्यासारखे मी आणि धनश्री सारखे माझे सहकारी,
सिटी- वन ट्रॅव्हल चे कर्मचारी, माझे
मित्र, सारेच ह्या दोन विमानाच्या प्रवाशांची आणि
त्यांच्या परतीची योजना करण्यात बुडून गेलो. आधी
ह्या दोन विमानांतून जातील
अश्या प्रवाशांची यादी बनवायची होती. हजारो
इच्छुक व्हाट्सअप आणि फेसबुक ग्रुप
मध्ये होते. धनश्री
आणि सहकार्यांनी खूप
मेहनत करून आत्यंतिक गरजू,आजारी,जेष्ठ नागरिक
अश्या चरेकशे लोकांची यादी तयार केली. त्यातून
३७८ पहिल्या दोन विमानातून जाणार होते. त्यांचा
मुंबई पुण्याला पोचल्यावर पुढचा मार्ग आणि व्यवस्था सुकर होण्यासाठी मी ठिकठिकाणच्या
नोडल अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांच्या
कडे त्या त्या शहरातील गावातील मुक्कामाला पोचणाऱ्या प्रवाशांची यादी
देणं जरूर होतं. त्यानुसार
त्यांची पुढील प्रवास, मुक्कामी
होणारे विलगीकरण आणि
इतर सोय हे ठिकठिकाणचे नोडल अधिकारी पाहणार होते. ह्या
यादीमधील काहींना तिकीटाची रक्कम परवडत नव्हती. काहींना
कमी पडत होती. कोणाकडे
विलगीकरणाच्या साठी पैसे नव्हते ... ह्या सगळ्यांसाठी पैशाची
तजवीज जमेल तशी स्वतःच्या
खिशातून आणि बरीचशी हितचिंतक, सेवाभावी
संस्था, व्यासायिक, देणगीदार, बिझनेस
फोरम आणि इतर बऱ्याच जणांच्या सहकार्यातून हातोहात
पार पडली. देणाऱ्याचे हात हजार आहेत हे पदोपदी
दिसत होतं... आफत
वेगाने कार्य सुखरूप पुढे सरकत होतं. ह्या सगळ्यातून मी आणि माझ्या
जिवाभावाच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून दोन विमाने १८९ अधिक १८९ प्रवासी घेऊन १३ आणि १४ तारखेला मुंबई व पुण्याला मार्गस्थ झाली.
एकूण ३७८ जीव सुखरूप मायदेशी पोचले.
त्यांच्या कुटुंबाना जाऊन
मिळाले...
पुणे मुंबई
मधील सरकारी कर्मचाऱ्यांनी, नोडल अधिकाऱ्यांनी ह्या
सगळ्या सोपस्कारात मोलाचा सहभाग दिला होता. मायदेशात उतरल्यावर सगळ्यांची जागोजागी पोचण्याची उत्तम सुविधा त्यांच्यामुळे झाली
होती.. १५ जूनच्या सकाळी
ह्या यशाचा आनंदोत्सव आम्ही
साजरा केला. एका सकाळी प्रत्यक्ष "मातोश्री' मधून मला आलेल्या फोनने
अभिनंदनाचा वर्षाव केला... मोठ्या
कार्यात मिळवलेल्या यशाला मान्यवरांनी
दिलेली ही शाबासकीची मोठी पावती होती. पुढील
विमानाच्या योजनांसाठी मोठा
आधार मिळाला.... ही
तर् फक्त सुरुवात होती. अजून
बरच काही करायचं होता... ह्या
दोन उड्डाणातून कोविडग्रस्त परिस्थितीत अडकलेल्याना चार्टर्ड विमानाने मायदेशी परत पाठवण्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली... पुढे
अजून चांगलं घडण्याची नांदी करत एका नव्या
प्रयोगाचा यशस्वी
आरंभ झाला. ह्या
नव्याने उघडलेल्या प्रवेशद्वारातून पुढील योजनांना मार्ग
सापडला. काही अजून चार्टर्ड विमानांच्या मागणीचा जोर
वाढला होता. स्वतः
सगळं करून मर्यादा छोट्या करून घेण्यापेक्षा कार्याचा आवाका आणि परीघ वाढवणं जरुरी होतं ... अजूनही
हजारो माणसं खोळंबलेली होती. विविध समुदायाच्या संस्थांनी
पुढाकार घेऊन काम करायचं ठरवलं आणि मी झालो त्यांचा मार्गदर्शक सल्लागार. दुबईतील
महाराष्ट्र मंडळानी लगेच
पुढाकार घेतला. दोन
विमानांसाठी एकत्रित प्रयत्न सुरु झाले. ९००
च्या वर लोकांनी
विनंती अर्ज पाठवले. मंडळाच्या
टीमने सगळ्याच्या सगळ्या ९००
हुन अधिक लोकांना
फोन वर संपर्क
करून त्यांची माहिती जमवली होती. जाण्याचं कारण आणि परिस्थितीच वर्गीकरण
करून मोठी यादी बनवली. ९००
पैकी ३८० ना फक्त पाठवता येणार होतं . हिमालयाएवढ्या ह्या संपर्काच्या कामाचा भार मंडळाच्या
पंचवीस हुन अधिक कार्यकर्त्यांनी लीलया पेलला. दोन
अजून विमानाच्या परवानगीचे कागद
आणि तयार केलेली यादी
एकत्रित करून आम्ही
कॉन्सिलवासात पोचवली... पुनश्च
एकदा परवानगीची वाट पाहायला लावणारा काळ ... ह्या वेळी जरा जास्तच लांबलेला ... ह्या सगळ्या सहकार्यांनी हजारोंच्या
प्रश्नांना दिलेली उत्तरे , दिलेला
धीर आणि वेळोवेळी केलेली इतर मदत... ह्या
सगळ्यातून मंडळाची अफाट ताकद आणि सामाजिक जवळीक
जवळून पाहायला मिळाली... काही अजून संस्था, कोकण बांधव संघटना,
अलं आदिल ग्रुप
ह्या सगळ्यांच्या तर्फे विमानांची योजना तयार होत होती... अजून
काही चार्टर्ड विमानांच्या परवानगीचा घाट
घेतला गेला. पाहता
पाहता ह्या सगळ्या कामाने एक मोठं
व्यापक रूप धारण केलं ... आता
इतर देशातील म्हणजे ओमान बहारीन वगैरे इथल्या मंडळां
बरोबर तिथून चार्टर्ड विमाने कशी आयोजित करता येतील ह्याचा विचार सुरु
झाला. तेथील मराठी मंडळांच्या आणि इतर संस्थांचे संपर्क आणि योजना सुरु झाली आणि हातोहात राबवली पण गेली... सगळ्याला यश येत राहिलं ... काही
कमी काही जास्त दिवसांच्या फरकाने विमानांच आयोजन
यशस्वी होत गेलं... जून
आणि जुलै महिन्यात ह्या
सगळ्या प्रयन्तांतून अजून ६ ते ७
विमाने रवाना झाली... एका छोट्या व्हिडिओ पोस्ट
मधून पडलेल्या ठिणगीने एक यज्ञ पेटवला होता... समाजसेवेचा महायज्ञ.
१५ जुलै ची मध्यरात्र ... मुंबई ला जाणाऱ्या एका चार्टर्ड विमानातील प्रवाशांना शुभास्ते पंथानं सन्तु म्हणून मी एअरपोर्ट
मधून निघालो ... हे एअरपोर्ट वर जाणं गेले दोन महिने अंगवळणी पडलं होत... तेथून
बाहेर पडताना नेहमी प्रमाणे ट्विटर, फेसबुक,
व्हाट्स अप ग्रुप वर अपडेट
करायला फोन उचलला ... सर्वप्रथम देवाचे, सर्व
हितचिंतकांचे , मित्र
सहकारी आणि सामाजिक संस्थांमधील कार्यकर्त्यांचे , सरकार दरबारी मदतीला धावून आलेल्या अधिकारी कर्माचार्यांचे, मंत्र्यांचे,
आणि माझ्यावर अफाट विश्वास दाखवणाऱ्या बंधूभगिनींचे...
साऱ्या साऱ्यांचे आभार
मानले आणि मेसेज पाठवला " आजपर्यंत गेलेल्या चार्टर्ड विमानसेवेमधून एकूण १२०० च्या आसपास प्रवासी
मायदेशी सुखरूप
गेले. मोहीम फत्ते झाली. तुम्हा
सर्वांचे हार्दिक अभिनंदन. महान मानवतेचा विजय असो"... माझ्या फोनवर आधी गेलेल्या, सुखरूप
पोहोचलेल्या आणि
आज निघालेल्या सर्वांचे
असंख्य संदेश येऊन धडकले होते...
वाचायला पाहायला वेळ मिळाला नव्हता ... गाडीत
बसून घरी जाता जात एक एक विडिओ,
ऑडिओ आणि टेक्स्ट मेसेज वाचायला लागलो...त्या
भावनिक मेसेजेस मधून प्रेम आणि जिव्हाळा ओतप्रोत ओसंडत होता... माझे डोळे पाणावून ते पाहत
राहिले , फोनची बॅटरी
संपे पर्यंत... घरी
जाऊन अंथरुणावर देह टाकला ... स्वप्नात
सारे माझे हजारो कुटुंबीय फेर धरून नाचत होते... त्या स्वप्न नंतर लागलेली ती शांत
आणि सुखाची झोप गेल्या कित्येक दशकात लागली नसावी... आणि मी सुखाने
झोपेंच्या अधीन
झालो.
***
मला गेले दोन तीन तास ही अफाट कहाणी सांगणारा राहुल
बोलता बोलता अचानक कुठेतरीहरवला... जणू
तो त्याच्या कुटुंबात पोचला होता.हजाराहून अधिक माणसांच्या त्याच्या कुटुंबाची विचारपूस करायला ...
एखाद्या जबाबदार कुटुंबप्रमुखासारखा ...मी त्याकडे
पाहत राहिलो ... खरतर
मला त्याबरोबर त्याला
आलेल्या त्याच्या बाराशे हुन अधिक कुटुंबियांच्या मेसेजेस वर बोलायचं
होतं ... त्या संदेशांमधला भावनिक जिव्हाळा
मला जाणून घ्यायचा होता... पण विचार केला, हे आपण पुढील लेखासाठी राखून ठेवुयात का?...
दुसऱ्या भागासाठी !!! ... आणि तूर्तास ह्या कहाणीचा पूर्वार्ध लोकांसमोर ठेवावा ह्या विचाराने मी लेखणी
सरसावली... ह्या अफलातून कार्याला काय आणि कसं वर्णावं ह्या
प्रश्नाच उत्तर
मला समर्थांच्या ओवीमध्ये सापडलं
...
दुसऱ्याच्या दुःखे
दुखावे,
दुसऱ्याच्या सुखे
सुखावे,
अवघेचि सुखी असावे,
ऐसी वासना II
अशी दुसऱ्याच्या
सुखात आपले सुख पाहण्याची इच्छा ठेवून कष्टी, पिडीत,
गरजुंसाठी ज्या राहुल आणि त्याच्या सहकार्यांनी " परसंतोषे कष्टविली आपुली काया" ... त्या सर्वाना आदरयुक्त प्रणाम.
******
लेखक: प्रकाश केळकर
दिनांक १ ऑगस्ट
२०२०
संपर्क:
राहुल तुळपुळे (ट्विटर)
@RahulTulpuleDXB
(ई-मेल) tulpule@gmail.com
प्रकाश केळकर (ई-मेल) pgk912@gmail.com
Khupach chhan, jeevant lekh!!
ReplyDeleteअतिशय सुंदर कार्य तुमच्याकडून घडले.. ईश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील..
ReplyDeleteखूप प्रेरणादायी अनुभव कथन. मायदेशी जाणाऱ्या प्रवाशांना तुमच्या रूपाने देवच भेटला. अनंत अडचणीतून मार्गक्रमण करत यशस्वी उड्डाण केल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.
ReplyDeleteSuperb!!
ReplyDeleteCommendable efforts..,🙏
ReplyDeleteCommendable efforts..,🙏
ReplyDeleteअप्रतिम लेख. काम इतकं मोठं आहे! त्यामागची तळमळ, झपाटलेपण शब्दातून पुरेपूर उतरवली आहे. सहस्र प्रणाम.
ReplyDelete