आठवणीतला उष:काल...
प्रत्येक सकाळ वेगळी असते, प्रसंगानुरूप आणि हरेक ठिकाणाची. आपापल्या परीने कमीजास्त सुंदर, छान, प्रसन्न,शांत, कधी जागरणाने आळसावलेली तर कधी मलमली तारुण्य वगैरे पांघरलेली... वेगवेगळ्या रूपांची ...लहानपणी सुट्टीत प्रवासाला जाताना उत्साहाने भरलेली एका हाकेत उठवणारी, बरेचदा अभ्यासासाठी जीवावर येऊन डोळे चोळत उठायला लागणारी, पुढे मग नोकरीसाठी वेळेच्या बंधनात बांधून उठवणारी तर कधी रंगलेली महेफील जागवल्यावर हुरहूर लागून उठायला लावणारी.... इतर वेळी सकाळी आळसावल्या सारखं होतं, पण दिवाळीच्या पहाटे मात्र एक वेगळाच नूर असतो... आज दिवाळी आहे ह्या विचारताच एक प्रसन्नता घेऊन ती सकाळ उगवते. मग ते ठिकाण जगाच्या कोपऱ्यात कुठे का असेना.... पण काहीवेळा प्रातःकालाची नाळ मात्र स्थळ आणि वास्तूशी अगदी घट्ट जोडलेली असते. ह्या आठवणी मग कधीतरी खुणावतात... लहानपणी सुट्टीत अनुभवलेले ते प्रसन्न क्षण दरवाळतात... अश्याच एका प्रातःकाळी मला काही ओळी सुचल्या ... माझ्या कोकणातील गावामधल्या सकाळच्या उबदार आठवणींना जागवत.
अवकाशाच्या ताम्रपटावर
सुवर्णकण लखलखले
माडांमधुनी क्षितीजावरती
सुर्यबिंब अवतरले.
काळोखाच्या गर्भातून
हुंकार तो आला,
चला गड्यांनो चला चला रे उष:काल झाला ॥
परसदारच्या बकुळफुलांवर
दवमोत्यांचे झाले शिंपण
प्राजक्ताच्या श्वेतपाकळ्या
सडा अंगणी केशर लेवून.
सवत्सधेनुचा गोठ्यामधुनी
हंबर ऐकू आला,
चला गड्यांनो चला चला रे
उष:काल झाला ॥
आडावरच्या राहाटावरती
सुंभ बोलतो लयीत करकर
गडगडणार्या पोहोर्यामधूनी
जलधारांचा अखंड पाझर.
माजघरातील सूर ओवीचा
जात्यावरती आला,
चला गड्यांनो चला चला रे
उष:काल झाला ॥
देव्हार्याच्या समयीवरती
शांत तेवते ज्योत सुंदर
पूजेसाठी आतुर झाले
ताम्हनातले ते दुर्वांकुर.
धीरगंभीर ओंमकार तो
शंखामधूनी आला,
चला गड्यांनो चला चला रे
उष:काल झाला ॥
***
खूप छान
ReplyDeleteखूप सुदंर
ReplyDeleteClass re Pakya, Best one.
ReplyDeleteवा, क्या बात .
ReplyDeleteप्रकाश, तुझी कविता एकदम चित्ररूप !!
आणि नवीन शब्द दिलास - गाईचा हंबर ..सुरेख
माजघरातील ओवीचा सूर जात्यावर आला ...किती सुरेल देखणी कल्पना 👌👌
अप्रतिम प्रकाश!
ReplyDeleteखूप आवडल. मस्त
ReplyDeleteछान सकाळ
ReplyDeleteBhari!! Masta lihilay
ReplyDelete