-भय, अटळता आणि अस्तित्व-

एका साहित्यप्रेमी मित्राने व्हाट्सअपवर खलील जिब्रानचं एक विचारकाव्य पाठवलं ... म्हणाला "वाच आणि पहा केवढं तत्वज्ञान सांगून गेलाय"  ... खरंच! त्या साध्या सोप्या भाषेत केवढा मोठा विचार मांडलाय जिब्रानने. एक नदी समुद्राला मिळताना तिच्या मनातल्या भीतीचं रूपक देऊन सांगितलेलं जीवनाचं सार ... पुढे दिसणाऱ्या विशाल समुद्राला पाहून दडपून गेलेल्या नदीला वाटणारी भीती, तिच्या लक्षात आलेला जीवनाचा अर्थ,त्यातील अटळता आणि त्यातून साकारलेली सकारात्मक भव्यता मन उजळून गेली... ह्या विचाराला व्यक्त करण्याचं आणि जिब्रानच्या त्या मुक्तछंदातील काव्याचं आपल्या कुवतीत स्वैर रूपांतर करावंसं वाटलं... त्याच्या एवढी खोली गाठणे शक्यच नाही... पण मी एक प्रयत्न केला तो इथे मांडतोय... 
आधी खलील जिब्रानचा मूळ विचार आणि नंतर माझा काव्यपंक्तीप्रपंच. 

-FEAR-
Khalil Gibran

It is said that before entering the sea a river trembles with fear.
She looks back at the path she traveled,from the peaks of the mountains, 
the long winding road,crossing forests and villages.

And in front of her, she sees the ocean so vast,that to enter there seems 
nothing more than to disappear forever.
But there is no other way. The river cannot go back. Nobody can go back. 
To go back is impossible in existence.

The river needs to take the risk of entering the ocean,because only then will fear disappear. 
Because that's where the river will know its not about disappearing in to the ocean, 
but of becoming the ocean.
---

- भय समर्पण-
ती अवखळ सरिता सुंदर, 
भयभीत नजर रोखून,
पाहते मुखी थिजून, 
तो विशाल अथांग सागर

वेळावत नजर ती पळभर, 
मनी उदास होते स्मरून,
गीरीउदरी अल्लड जीवन,
गतप्रवाह दिसतां क्षणभर.
 
तो चंचल खळखळ वावर, 
ती दरीडोंगरी उधळण,
ते प्रपातकपारी गुंजन, 
मनीभवरां उरतो गहिवर.
 
प्रकांड महारूप आकार, 
रोरांवती लाटा उसळून,
मनी भयभीतीने कंपन, 
पाहते नदी तो रत्नाकर.
 
साशंक चित्त उठे काहूर, 
की जाईन मी लोपून,
का देवून आलिंगन, 
भय मिटेल अपरंपार. 
 
हे जिवन सारे नश्वर,
जगणे अटळ असून,
तो मार्ग नसे परतून,
नियम सृष्टीचा निरंतर. 
 
हा नसे स्वाहाकार, 
पवित्र ऐसे मिलन,
करोनि भय समर्पण, 
ती झेपावत होते सागर... 
... ती स्वता: होते सागर.

***

Comments

  1. सुंदर..
    कल तक जो बेगाने थे,
    जन्मो के मीत है..

    ReplyDelete
  2. अप्रतिम!! प्रपात कपारी गुंजन वाह क्या बात है

    ReplyDelete
  3. छान काव्य. भावना पोहोचल्या

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog