उत्क्रांती...  

डार्विन च्या थेअरी नुसार माकडाचा हळूहळू माणूस झाला आणि हा मनुष्यजातीचा प्रवास अविरत चालू राहिला. त्याला स्वतःची ओळख पटू लागली. शक्ती युक्ती बुद्धी प्राप्त झाली आणि हळू हळू प्रगत होऊ लागली. त्याला आता गरज भासायला लागली, स्वतःची पटलेली ओळख दुसऱ्याला सांगायची आणि पटवून द्यायची.  कर्तृत्व अकर्तृत्व, यश अपयश, भाषा, जात पात, धर्म, देश, व्यवसाय, नातेसंबंध, आपलं परकं, आणि शेवटी शत्रू व  मित्र ह्यातून ही ओळख तो देता झाला आणि स्वतःची अशी ओळख निर्माण करता झाला. पण ह्या पलीकडे जाऊन अजून एक बदल हळू हळू घडू लागला. दुसऱ्याला त्याची ओळख करून घेणं आणि ती ओळख पटवून घेणं जरूरी होऊ लागलं... मी तो मीच आणि कोणी तोतया नाही हे सांगण्यासाठी काही भक्कम पुरावा आपल्या जवळ असावा हे माणसाला वाटू लागलं ... आणि इथेच ओळख पटवून देण्याच्या साधनांचा शोध झाला असावा. 

स्वतःची ओळख पटवून द्यायला राजपत्र, मुद्रा, विशेष पोशाख, आभूषणं , अलंकार, आणि शब्द निर्माण झाले... ठराविक ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी परवलीचे शब्द तयार झाले. प्रवेशद्वारावरील पहारेकर्याच्या शिस्तबद्ध विचारणेला उत्तरातून ओळख देऊ लागले... खरी खोटी कायमची तात्पुरती वगैरे ओळख पटवून देण्याची पद्धती निर्माण झाली... काळाच्या ओघात प्रगती झाली आणि तसतसा ओळखपत्र पासपोर्ट आयडेंटिटी कार्ड ह्या सगळ्याचा आधार हळूहळू विस्तारात गेला आणि प्रवेश मिळू किंवा नाकारला जाऊ लागला. चांगल्याच्या काही पाऊले नेहमीच पुढे असणाऱ्या गुन्हेगार मंडळींनी मग ह्या ओळखपत्रांची चोरी करून त्याची फसवी ओळख निर्माण केली... माणसाला स्वतःच्या ओळखीची काळजी घेणं भाग पडलं... आयडेंटिटी थेफ्ट चा जमाना सुरु झाला. 

काही दशकांपूर्वी प्रत्यक्ष प्रवेशा एवढंच अप्रत्यक्ष प्रवेश करणं जरुरी होऊ लागला. माणसाच्या संभाषणाच्या, संपत्तीच्या आणि बाजारहाटाच्या गरजा आणि त्याच्या पूर्ततेची व्याप्ती जशी वाढत गेली तशी मग ई-मेल, ऑनलाईन बँकिंग आणि शॉपिंग चा पसाराही वाढत गेला.... ओळखपत्राचं रूपांतर संगणकीय भाषेत सुरू होउंन डिजिटल ओळख पटवून देण्याची गरज भासू लागली...आणि युसरनेम, पासवर्ड, च्या जगात माणूस ओढला गेला. ह्या ओळखीलाहि अनेक गैरवाटा फुटल्या आणि मग फसवणूकीतुन सुटका होण्यासाठी ओ टी पी, ऑथेंटिकेशन वगैरेचा वापर वाढला... 

आयडेंटिटी थेफ्ट च्या अक्राळविक्राळ भेडसावणाऱ्या राक्षसा पुढे ह्या साऱ्या गोष्टी अजून प्रगत होतच राहिल्यात आणि मानवही त्यात पार गुरफटून  गेलाय. 

कालांतरानी बहुदा ओळखी हळू हळू नाहीश्या होतील. जात पात धर्म वेष आभूषणं भाषा शब्द ओळखपत्र पासपोर्ट आयडेंटिटी कार्ड युसरनेम पासवर्ड हे सारं मागे पडेल आणि उरेल फक्त ... तुमचा संगणक क्रमांक, तुमच्या डिजिटल फूटप्रिंट चा मागोवा , तुमच्या संगणकीय हालचाली , त्याची जागा ,तुमच त्यावेळचं सभोवताल, तुमची त्यावेळची कुठेतरी कोणाला तरी जगाच्या कोपऱ्यात बसून दिसणारी छबी ... आणि इतर त्याला संलग्न गोष्टी... म्हणतात ना कि " बिग ब्रदर इज वॉचिंग यु "... तुमची ओळख तेंव्हा त्याच्या हातात असेल... तुमच्याकडे नाही!!!

उत्क्रांती होतच असते; सतत....तशीच ही पण... ओळखीची. 

***
प्रकाश केळकर 

Comments

  1. मी सतीश दाणी. आहे का ओळख?
    छान आढावा.

    ReplyDelete
  2. Identify crisis of a different type!!

    ReplyDelete
  3. Very true...what we will leave is a digital footprint on the sands of time...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog