मतदानाचा दिवस

सकाळपासून खुरमांडी घालून बसलेल्या तात्याबानं दुमडलेला पाय सरळ केला, पायाला आलेल्या मुंग्याना वाट करून द्यायला एका हातानं पाउलाचा अंगठा दुमडला, खुब्याच्या हाडांमधे उठलेली एक बारीक पण सणसणीत कळ पचवली  आणि  कानावरून अर्धी विझवून ठेवलेली विडी काढली.  बसकनाच्या खाली ठेवलेली माचीस शोधायला हात घातला पण ती मिळेना...  " इच्यामारी! नेली वाटतं ... म्हाताऱ्याला माचीस पण ठिवत नाहीत का काय आता." ... माचीस लंपास केलेल्या आपल्या मुलाच्या नावानं उद्धार करून तो कोनाड्यात ठेवलेली दुसरी माचीस शोधायला सरपटत भिंतीलगत सरकला. दोन चार फूट सरकतानापण होणारा त्रास कपाळावर त्याच्या चार जादा उमटलेल्या आठ्यांमधून दिसत होता. धूर काढायची तल्लफ आलेल्या तात्याबान तो त्रास तसाच गिळला आणि कोनाड्यात वर हात घालून कशीबशी माचीस मिळवली... तिथंच भिंतीला टेकून त्यानं बिडी शिलगावली आणि एक दमदार झुरका छातीत भरून नाका तोंडातून सोडल्यावर त्याच्या जीवात जीव आला. धुरांच्या लोटांमधून मग त्याला सकाळपासून आजूबाजूला कोणीच कसं दिसलं नाही ह्याचं आश्चर्य वाटलं. खोकल्याची उबळ दाबत त्यानं एक वरच्या पट्टीत हाळी घातली ... " म्हाद्या .... म्हाद्या ... रखमा ... रखमे ... आरं कोनी हाय का नाय ...." नातवंडांच्या शाळेला सुट्ट्या चालू होत्या पण कोणीच कसं नाही आजूबाजूला. गेली असणार हुंदडायला. तात्याबाला पण एकदम माळावर जावसं वाटलं ... बोटाला बसलेल्या चटक्यानं जागा होऊन दोन चार झुरक्यात संपलेल्या बिडीच थोटुक कोपऱ्यात भिरकावून देत त्यानं कपाळावर हात धरला. एक बाजूला तुटलेल्या काडीला दोरा गुंडाळून सावरलेला  मोठ्या भिंगाचा चष्मा डोळ्यावर ओढून दिसेल तितक्या दुर्ष्टीनं लांबवर पाहिलं ... धूसर नजरेला कोणी दिसलं नाही तसा परत सरपटत बसकणावर येऊन बसून राहिला.अजून बराच वेळ उन्हं उतरेपर्यंत तसच बसून राहण्याच्या तयारीनं.

तात्याबा आता तसा बसूनच असतो गेल्यावर्षी पासूनकमरेखाली जणू त्राण नसल्या सारखा ... माळावरून परत येताना मोटारसायकलवर भरधाव येणाऱ्या पाटलाच्या पोरानं  त्याला पाहिलं नाही, का तात्याबाला ती येताना दिसली नाही, हे फक्त पाटीलच जाणे ... खुब्याला जबर मार लागून दोन महिने तालुक्याच्या हॉस्पिटलात काढून तो घरी आला तेंव्हा पासून उठलाच नाही. दीनकर मास्तरांच्या कृपेनं मिळालेल्या अलुमिनिमच्या दोन जुन्या गादीवाल्या कुबड्या घेऊन कोणाला तरी बरोबर नेवून सकाळचे विधी एकदा उरकले कि बाकी सगळा दिवस मुक्काम इथंच, बसकनावावर...  मुलगा तुक्या आणि सून राधा जमेल तेवढं जमेल तेंव्हा फिरवणार आणि नातवंडांना खेळातून वेळ मिळाला तर ती जवळ येऊन बसणार. एकंदर काय आपण आता पार बिनकामाचे, टाकाऊ झालो आहोत हे तात्याबाला कळून चुकलं होत. पूर्वी मास्तराच्या ओसरीला टेकलं कि मास्तर मोठ्यानं वाचत असलेल्या पेपर मधून आणि चावडीवरच्या रेडिओ वरून दोन चार बातम्या तरी कानावर पडत होत्या ... आता ते पण नाही. काय वर्तमान आहे आणि सध्या काय चालू आहे ह्याची काहीच गिनती नसलेला तात्याबाच सगळं जगच एकदम आताशा बदलून गेलं होतं . तरी बरं कांन शाबूत होते ,दृष्टी धूसर का होईना होती म्हणून आजूबाजूला गेले काही दिवस काहीतरी धामधूम चालू आहे ह्याची जाणीव त्याला झाली होती. दोन पाच वेळा धुराळा उडवत वाडी वाडी मधून फिरणारी कर्णा लावलेली एक टेम्पो घरावरून गेली तेंव्हाच तात्याबाला समजल, निवडणूक जवळ आलेली आहे. कोणती ते कोणास ठाऊक. गावातल्या पंचायतीची नक्कीच नाही पण छोट्या किंवा मोठ्या सरकारची नक्की. पंचायतीची असती तर एव्हाना पाटील स्वतः  येऊन गेला असता इथं वस्तीवर. छोट्या सरकारची म्हणजे मुंबई मधल्या सरकारची निवडणूक असली तरी एखाद दुसरा पुढारी जिल्ह्यांमधून वाट काढत इथं येणारच. पण  ह्या वेळी नक्की मोठ्या सरकारची निवडणूक असणार, दिल्लीवाली... कोणी भेटायला आल्याचं दिसलं नाही त्यावरून तात्याबान आपला निष्कर्ष काढला आणि आता काय करायचय, कोणती का असेना. कुठं जाणारे आपण मतदानाला. हे असं खुरडत? अस मनाशी बजावत बसून राहिला.  

दुपार डोक्यावर आली. सकाळी भाकरी कालवण बसकनाच्या बाजूला भगुल्यात झाकून ठेवून गेलेल्या राधाला मनोमन शंभर आशीर्वाद देत तात्याबान जेवण उरकलं... लोटा तोंडाला लावून ढसाढसा पाणी पिऊन एक दमदार ढेकर दिला आणि तोंड खंगाळून बसल्या जागेवरूनच एक लांब चूळ समोर अंगणात टाकली. नवीन बिडी शिलगावून दोन झुरके मारून विझवून कानावर गेली आणि दुपारचं अर्धा घटका त्यानं डोळे मिटले... आज कर्णा लावलेल्या रिक्षाही घरावरून गेल्या नाहीत, आणि नातवंडांच्या खेळण्याचा गलकाही झाला नाही...  निवांत शांततेत तात्याबांची वामकुक्षी जरा जास्तच लांबली. तीन चारचा सुमार असावा. एकदम पोरांच्या गाळक्यानं तात्याबांचे डोळे उघडले... पोरं वावटळीसारखी अंगणात घुसली आणि हाका मारे पर्यंत तशीच दिसेनाशी पण झाली. तात्याबाला कोणीतरी हवा होता. त्याला केव्हाच जायचं होतं. आता बेंबीखाली कळ पण यायला होती. अजून थोडा वेळ थांबायला लागेल. कुबड्या असल्या तरी तात्याबा परसातल्या  बांधलेल्या संडासात एकटा कधी गेला नव्हता. तीन पायर्यांच्या त्या दरवाजेबंद कुपात पोचेपर्यंत त्याचा जीव निघायचा... नातवंडांपैकी कोणी धरायला असला कि तेवढाच म्हाताऱ्याला धीर यायचा... उगीच पडलं तर? केवढ्याला पडायचं परत? ... घाबरून कासावीस होऊन त्यांन उरलेली बिडी पेटवली आणि  पुन्हा एक म्हाद्याला हाळी दिली. दोन चार शिव्या घालून परत मोठयाने हाका मारून तात्याबा शांत झाला... वस्तीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या दोन चार तारण्या पोरांनी त्याची हाक ऐकली होती. तिथूनच ओरडून त्यातल्या एकानं विचारपूस केली ... " काय झालं तात्या? समद बरं हाय ना? का ओरडायलात "... तात्याबान  खाकरून पिंक टाकली आणि उत्तरला " आरे मला जायचंय रे ! कोणी न्हाई मदतीला... म्हणून हाक मारायलोय". पोरं काही बोलणार तेवढ्यात बुलेट वाजली...  धुराळा उडवत हिरवा गॉगल लावलेलं पाटलाचं संभाजीराव ऐटीत येताना दिसलं तसं पोर एकदम उठून उभी राहिलीचालू बुलेटवर तसाच त्यांच्यापाशी पाटील थांबले... पोरांचा राम राम वगैरे घेऊन विचारलं " काय रं काय चाललंय? मतदानाला गेला का नाय?" ... पोरं एकदम गलक्यानं " म्हंजी! ते तर पहिलं पहिलं सक्काळीच पाटील... कवाच झालं " ... समाधानी चेहऱ्यांनी पाटलांनी विचारलं " वस्ती वरचे समदे जाऊन आले का? आरे शंभर टक्के झालं पाहिजे आपल्या गावातून मतदान , काय?" ... केसांची झुलपं सावरीत किश्या उत्तरला " म्हंजी पाटील, तुम्ही सांगायचं आणि आम्ही नाय करायचं आस कदी झालाय का? सगळे बायाबापडे मोजून जाऊन आले कि... पायजे तर बोटं तपासा सगळ्यांची शाई लागलीय समद्यांना "... संभाजीराव खुश होऊन बुलेट चा गियर टाकून निघायला आणि तात्याबान हाक मारायला एकच गाठ पडली  " आरे किशन ... आरे मला मदत करा रं. मला जाऊन यायचं हाय ... " संभाजीरावचं लक्ष ओसरीत बसलेल्या तात्याबाकडे गेलं ... " किश्या , ह्ये जाऊन आलं का मतदानाला?" ... अचानक अंगावर आलेल्या प्रश्नाला झेलत किश्या बोलला " अवं ह्ये कसं जाणार? चार पावलं चालत बी नाही अजून कोणी नेल्याबिगर..." संभाजीरावनी बुलेट बंद केली, स्टॅन्डला लावली आणि तात्याबांकडे जायला लागले. गांगरून किश्या आणि बाकीची पोरं त्यांच्या मागे. " काय तात्या बरं हाय न्हवं? " ... " जी , किरपा हाय जी तुमचीखोकल्याची उबळ दाबत तात्या पाटलाला बोलला. " चला आम्ही नेतो तुमाला ... " पाटलांनी इशारा करताच किश्या आणि पोरांनी तात्याबांची मोट बसकनासकट उचलली आणि बुलेट वर नेवून ठेवली... " sss  कोणी तरी धरून बसा रं मागं त्याला " बुलेटला किक मारत पाटलानं हुकूम सोडला. पाटलाच्या आणि किश्याच्या मध्ये तात्याबा बुलेट वर फिट बसला... पुढंच्या मडगार्डवर पितळी दांडीला छोटा भगवा झेंडा आणि पाठीमागच्या चाकाच्या रबर फ्लॅप वर " राजे " असं ऐटीत लिहिलेल्या पाटलाच्या बुलेट वर मग ही वरात भरधाव निघाली... " आरं मला कुटं  न्यायलात ? मला परसात जाऊन यायचंय ..." बुलेट च्या आवाजात तात्याबाचं बोलणं किश्या आणि संभाजीराव दोघांच्याहि कानात शिरणं अशक्य होत

पाटलाची बुलेट थेट येऊन शाळेच्या पुढ्यात थांबली... तुरळक गर्दी होती, ती ह्या वराती भोवती जमली ... " sss काय तमाशा हाय व्हयचला  बाजूला ... " पाटलानं बुलेट स्टॅन्ड वर लावली तेवढ्यात किश्यानं तात्याबांच मुटकुळं पाठुंगळीला मारलं आणि शाळेच्या पायऱ्या चढून मतदान केंद्रापाशी नेलं.. पाटलाला अचानक काही तरी आठवण झाली ... त्यानं किश्याला थांबायला सांगितलं ... खिशातून मोबाईल काढून शाळेच्या चपराश्याला तात्याबाच्या पालखी सोबत फोटो काढायला लावले...आणि  " हाss , ने आता आत " म्हणून किश्याला इशारा केला... तात्याबा मतदान केंद्रात पोचला होता... आत मध्ये काय झालं कसं झालं काय माहित... पण किश्यानं नेलं तस मुटकुळं थोड्याच वेळात बाहेर आणलं ... " पाटील झालं बरका  ... बोटावर शाई हाय लावलेली ... पाहून घ्या " ... पाटील हसला आणि तात्याबाला विचारलं " आर बाबा सकाळीच बोलला आसता तुला जायचंय तर एवढी धावपळ कशापाई केली असती. आरामात वाजत गाजत आणला असतं तुलाम्हाताऱ्या आन दिव्यांग मतदारांना केंद्रावर आणायच तर आमचं कार्य. उद्या फोटू येतो का नाय बघ  पेपरात आपला. गावात शंभर टक्के मतदान. संभाजी राव पाटलांनी पाठुंगळी वर नेवून वयस्कर मतदारांना त्यांचा हक्क बजावायला दिला " ... पाटील गडगडाटी हसला तसे सगळे हसले ... बुलेटला किक मारून किश्याला पाठी घालून मोटारसायकल धुराळा उडवत पुन्हा दिसेनाशी झाली... तात्याबा मागच राहिला हे त्यांच्या ध्यानी पण नव्हतं ... अजून एखाद दुसरा मतदार हक्क बजावायचा राहिलाय का हे बघणं त्यांचं कर्तव्य...  त्यांना उसंत होती कुठं ?

शाळेच्या पायरीवर बसलेल्या तात्याबान दोन चार पोरांना हाताशी धरून कोपऱ्यातल्या शाळेच्या संडासात आपलं दुपारपासूनचं राहिलेलं कार्य उरकलं. मोकळा झाल्याचं आणि अनपेक्षीत मतदान करायला मिळाल्याचंदोन्हीचं समाधान त्याच्या चेहेऱ्यावर झळकत होतं ... आपण परत घरी कसे जाणार हि चिंता अजून तरी त्याला शिवली नव्हती ... शाळेच्या शिपायाकडून उसनी बिडी मागून दमदार झुरका मारला आणि " कोनाला दिलं मत तात्या?" ह्या शिपायांन विचारलेल्या प्रश्नाला दुसऱ्या झुर्क्याच्या लोटाबरोबर तात्याबा उत्तरला... " काय कि बा. न्हाय आठवत ... मी आत गेलो, सायबाला वळख नाव गाव सांगिटलं, त्यानं बोटाला शाई लावलीकिश्या व्हताच बरुबर. आता आजकाल मशीन आस्तंय. मला काय त्यातलं कळतंय. किश्या म्हनला बटन दाबायचं. मी म्हनलं  कंच? त्यानं एकावर इशारा केला आन दाबा म्हनला... झालं

 मतदानाचा दिवस संपला... गावामधल्या सगळ्यांनी आपला हक्क बजावला होता आणि उद्या पेपरात येणाऱ्या फोटोमुळं तालुक्याच्या पार्टी ऑफीसात संभाजीरावचा वट वधारणार होता. थोड्याच वेळात उन्ह उतरली ,लांब सावल्या पण हळू हळू नाहीशा होऊन संधीप्रकाशात विरघळून गेल्या... केंद्रावरचे काम करणारे, शाळेचा चपराशी, गावातली इतर मंडळी केंव्हाच निघून गेली होती. शाळेच्या पायरीवर तात्याबा मात्र बसकनासकट तसाच बसून होता. बराच वेळ बसून अवघडलेला पाय त्यानं सरळ केला, पायात आलेल्या मुंग्या जाण्यासाठी अंगठा  मुडपला , खुब्यातून एक सणसणीत कळ गेली ... तो त्रास गिळायला आता त्याच्याकडे विडी नव्हती... बिनकामाचा तात्याबा सुरकुतलेल्या बोटाकडे आणि त्यावर लागलेल्या काळ्या शाई कडे पाहात तसाच बसून राहिला... परत घेऊन जायला कोणी येईल ह्याची वाट बघत.

***
प्रकाश केळकर 

Comments

  1. अगदी गावातले वातावरण अणि निवडणुकीचे पण छान उभे केले . गावातली मतदानाचा हाच प्रकार सर्व ठिकाणी असतो

    ReplyDelete
  2. ग्रामीण ढंगाची अतिशय ह्रद्य कथा! अभिनंदन प्रकाश! असेच लिहित राहा!!!

    ReplyDelete
  3. Masta lihilay!! Sagla chitra dolya samor ubha rahila. Excellent...

    ReplyDelete
  4. Excellent.its real picture of villagers and voters. Flow is very natural.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog