२० मार्कांचं नागरिकशास्त्र ...  

वेळ:   सकाळी ७.०० वा 
स्थळ : सोसायटी जवळचा हमरस्ता 
भल्या मोठया लांब साखळीच्या ( ओह सॉरी , डॉग लीश म्हणतात हल्ली त्याला ) एका बाजूला व्यवस्थित पांढऱ्या केसांचा बॉब राखलेलेल्या, अंगात अमेरिकेच्या मागील दौऱ्यात घेतलेला पुलओव्हर आणि जॉगिंग ट्रॅकपॅन्ट घातलेल्या काकू ( त्यांना असं संबोधण्याच धाडस मी लिहितानाच फक्त करू शकतो ) आणि  दुसऱ्या बाजूला रस्त्यावरचा दिसेल तो कचरा पालापाचोळा आणि इतर बरच काही हुंगत चाललेला त्यांचा 'रोव्हर' पाहून मी थांबलो ... त्यांचा माझा परिचय सोसायटीत राहण्याऱ्या एक ह्यापलीकडे हल्ली जरी नसला तरी एकेकाळी त्यांनी गणेशउत्सवात म्हटलेल्या एका उथळ गाण्यामुळे लक्षात राहिलेला... " काय म्हणताय ? कश्या आहात ? कसं काय चाललंय प्रदीपच ? " ( खरंतर मी 'पद्या' असा उल्लेख करणार होतो पण म्हटलं जाऊदे . इंजिनेरींग च्या पहिल्या आणि शेवटच्या वर्षात दोन दोन वर्ष अभ्यास करून पद्या आता अमेरिकेत असतो हे मला तेवढ्यात जाणवलं... असो! ) आमच्या हवामानाच्या गप्पा  संपल्या आणि माझं लक्ष 'रोव्हर" कडे वळलं. "नवीन डॉग पपी ? गेल्या सुट्टीत आलो तेंव्हा नव्हता. छान आहे. काय ब्रीड ?" मी आपलं उगीच काहीतरी ...बोलायचं म्हणून !!! एरवी अल्सेशियन , पॅमेरेनियन आणि डॉबरमन ह्या पलीकडे मला काही कळत नाही! ... " हो दीड वर्ष झालं ... आणि पपी काय अरे ? आता तो फुल्ल ग्रोन आहे" ...  त्या  दोन वित लांब आणि आर्धा वित उंच फुल्ल ग्रोन कडे मी एकदा पाहून घेतलं ... काकूंनी ब्रीड वगैरे सांगायला सुरुवात करेपर्यंत बराच वेळ गेला.  रोव्हरने त्यांना हिसडा मारून लक्ष वेधण्याचा एकदोन वेळा प्रयत्नही केला ... शेवटी तो कळवळून भुंकला ... तो का घायकुतीला आला होता हे त्याच्या भूंकण्यातून स्पष्ट होत. " हो हो विसरले...  सॉरी सॉरी बबू ! ( हे रोव्हरला ) ... अरे काय आहे ( हे मला) त्याची ठराविक जागा आहे ना ! त्या फूटपाथ च्या कडेला ... तिकडे  जायचंय त्याला... टॉयलेट ट्रेनड आहे रोव्हर... प्रदीप कडे पण सिएटल ला सेम डॉग आहे... इतक वेल बिहेव्हड ब्रीड नाहीच दुसरं. म्हणून आम्ही पण हेच घेतल इथे ... कॉन्टिनुटी हवी किनई तिकडे गेल्यावर " ...  स्वतःच्या विनोदावर खळखळून हसत काकूंनी पुढील पंधरा मिनिटे मला रोव्हरच ब्रीड त्याचे आई बाबा, त्याचे पूर्वज , मग प्रदीप च्या अमेरिकेतील "रेंजर"च सगळं कसं सेम आहे इत्यादी इत्यादी पिळलं.  एव्हाना रोव्हरचा पण 'ज्यासाठी चालला होता अट्टाहास' तो कार्यभाग उरकला होता ... मागील दोन पायानी उगीचच माती दोन चारदा उधळून त्याने आनंद व्यक्त केला... काकूंनी मग एक उसासा टाकून  " आत्ता अमेरिकेत असते तर पू बॅग मधून उचलून टाकायला लागल असतं " . वगैरे वगैरे सांगायला सुरुवात केली ... माझ्या चेहेऱ्यावर आणि नजरेत  रोव्हरच्या आत्ताच आटोपल्या कार्यभागाच कसं काय ? हा भाव उमटलेला त्यांना  दिसला असणार ...  " इथे तसं काही नाही रे . पू ब्याग पण तशा मिळत नाहीत सहज... प्लास्टिकची पण  बंदी आहे ना आता !... जाऊदे, आपल्याकडे चालतं सगळं. मातीत जातं मिसळून ... चला , निघते.  उशीर झाला ... ये रे कधी तरी घरी.  आहेस ना अजून?  मग ये प्रदीप आणि रेंजर चे फोटो पाहायला..."  बोलत बोलत काकू आणि रोव्हर निघून गेल्या... रोव्हरची फुटपाथ वरची  निशाणी तशीच मागे ठेवून... मी पण माझ्या कामा साठी रस्ता धरला... हो फुटपाथ वरून चालणं शक्यच नव्हतं ... रोव्हर आणि त्याच्या इतर मित्रांचं आवडतं ठिकाण असणार हे ... जाताजाता मुनिसिपालटी च्या झाडूवाल्या बाईचे शब्द ओझरते कानी पडले... " शिकल्यासवरल्याली मानस ... आन ह्यांची कुत्रीबी शिकल्याली असत्यात म्हन ... घान मात्र आम्ही लोटतोय ... काय करायचं ह्यांचं शिक्षन ... घाला समद चुलीत ... xxxxx ...xxxxx "  पुढचे शब्द ऐकायला होत कोण तिथे? सगळे रोव्हर आणि टॉमी एव्हाना घरी जाऊन स्वच्छ ताटलीत मजेत डॉग फूड खाण्यात आणि त्यांच्या मालकिणी डॉग स्पा च्या अपॉइंटमेंट घेण्यात मग्न होत्या ... स्वच्छ राहिलंच पाहिजे , डॉग घरी ठेवायचा असेल तर!!!

आणि त्या झाडूवालीला तरी कसं कळणार ? आणि काय तिला सांगणार? ... अग आम्ही मोठे शिकलो सवरलेले जरी असलो तरी आमच्या शिक्षणात नागरिक शास्त्र फक्त वीसच मार्कांच असायचं ... आमची काय त्यात चूक? 

***
 प्रकाश केळकर 

Comments

  1. Hope people will follow US discipline in our country soon

    ReplyDelete
  2. Very well written PK. Civic sense is our biggest challenge.

    ReplyDelete
  3. २० मार्कांंच्या नागरिकशास्त्राला १०० मार्क प्रकाश! 💐

    ReplyDelete
  4. 😀 sadhya prasangataun mothya jababdaarichi jaaneew !
    Civics aadhich 20 marks cha, tyat fakta fill in the blanks ch asayche jasta , tya mule jababdaarichi jaanew pan ardhawatach rahili may b 😃

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog