स्थलांतराच घड्याळ... 

" तब्बल पंचवीसशे मैल प्रवास करत उत्तरेकडील भागातून पार मेक्सिको मध्ये जातात हि फुलपाखरं... चमत्कार निसर्गाचा... एवढासा जीव कुठून कुठे प्रवास करतो नाही का!. कमाल आहे....  चला झोपायला पाहिजे, उद्या सकाळी लवकर उठायचंय, साडेसात ची फ्लाईट आहे" ... काही तासांचा विमान प्रवासही नकोसा झालाय हे चेहऱ्यावर दाखवत मी  टी व्ही चा रिमोट दाबून ती डॉक्युमेंटरी बंद केली.

रात्रभर त्या मोनार्क फुलपाखरांचे थवे माझ्या डोक्यात उडत राहीले. अंथरुणात पडल्यापडल्या डोळे टक्क उघडे ठेवून ती प्राण्यांच्या स्थलांतरावरची फिल्म पुन्हा पुन्हा मी आठवत राहीलो... एक ना अनेक, निसर्गाचे ते अचंबित करणारी रूपं बघत...  झोपेच्या पूर्ण आधीन होवून स्वप्नांच्या राज्यांत मायग्रेट होऊनहि पाहात राहिलो... वर्षाच्या ठराविक काळात आफ्रिकेच्या सेरेंगेती मधील धावत सुटणारे विल्डेबिस्ट, श्रीलंके मध्ये दरवर्षी अनेक मैल चालत जाऊन एका तळ्याकाठी विशिष्ट काळात जमणारे हत्तीचे कळप, सैबेरिया च्या थंड प्रदेशातून पार राजस्थान च्या उष्ण प्रदेशापर्यंत उडत जाणारे सायबेरियन क्रेन्स , प्रति वर्षी मेक्सिको ते आर्टिक समुद्रा पर्यंत हजारो मैल पोहून जाणारे व्हेल आणि हिंदी महासागरातील क्रिसमस बेटावर दरवर्षी लाखोंच्या संख्येनी जंगलातून समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी टुकूटुकू चालत सुटणारे लाल खेकडे... कोणी थंडी पासून सुटका करण्यासाठीं, कोणी प्रजोत्पादन करण्यासाठी,  कोणी तिकडे अन्नपाणी मुबलक असेल म्हणून तर कोणी अजून काही अनाकलनीय कारणांसाठी... प्राण्यांचा हा प्रवास दरवर्षी ठराविक वेळी, ठराविक काळात ठराविक ऋतू मध्ये चालूच आहे आणि चालूच राहणार... निसर्गाचं चक्र फिरत असे पर्यंत. त्यांच्या शरीरात, रक्तात, किंबहुना डीएनए मधील जिन्स मध्ये हे चक्र बसवलेलं असावं ... घड्याळा सारखं चालणारं. वेळ झाली? चला... थंडी सुरु? निघा ... इथला चारा संपला? पळा... आपोआप घडत आणि हे... कोणी सांगायला जात नाही अन कोणी स्वतःच स्वतः ठरवून निघत नाही... त्यांच्यात असलेलं घड्याळच हे सगळं करवून घेत असणार... कसलाही अलार्म न वाजवता!!!... पण, आत्ता हे काय वाजतय? ... मी धडपडत उठलो आणि माझ्या घड्याळाचा गळा दाबला... एअरपोर्टवर जाण्यासाठी उठायला लावलेला गजर बराच वेळ वाजत असणार बहुतेक. 

सकाळच्या चहा बरोबर वाचता न आलेला पेपर घाई घाईत खाकोटीला मारून टॅक्सी पकडली. आरामात मागे बसून पेपर उघडला .... आणि पहिल्याच बातमीनं अस्वस्थ झालो. तश्या हल्ली सगळ्याच बातम्या अस्वस्थ करणार्याच असतात म्हणा... पण तरी ही बातमी जरा जास्तच लक्षवेधी होऊन गेली ... कालच्या डॉक्युमेंटरी आणि झोपेत पाहिलेल्या तिच्या आठवणींची जवळीक करणारी... प्राण्यांच्याच बाबतीत... पण सगळ्यात हुशार अश्या मनुष्यप्राण्याच्या बद्दलची बातमी... दक्षिण आणि उत्तर अमेरिकेच्या मधल्या एका देशातून हजारोंच्या संख्येने रस्त्यावरून चालत उत्तरेकडे मार्गक्रमण करणाऱ्या मानवांची... जमेल ते सामान, बोचकी, ब्यागा, मुलं, म्हातारी कोतारी, स्त्रिया, पुरुष असा चालत निघालेला जनसमुदाय ... आपल्या देशात प्रदेशात होणाऱ्या अत्याचार आणि गुंडगिरीला कंटाळून उत्तरेकडे चाललेला ... प्रगत देशाच्या वाटेकडे आशेने भरलेले डोळे लावून... आपल्या राहत्या घरदाराला निरोप देवून...  जगण्याच्या दूर्दम इच्छेपोटी चालत निघालेल्यांची, ठळक मथळ्यात मोठ्या फोटोखाली छापलेली अंगावर काटा आणणारी जीवघेणी स्थलांतरितांची कहाणी... मला वाटतं प्राण्यांप्रमाणे ह्यांच्या पण शरीरात ,रक्तात , डीएनए मध्ये दडलेलं असतं ते घड्याळ..स्थलांतर करायला लावणारं...  ह्या सगळ्यांच्याहि जीन्समध्ये  पेरलेलं...  फरक एवढाच कि ते चालतं कोणा दुसऱ्याच्या इच्छेनुरूप ... कोणीतरी फिरवत असतं त्याचे काटे, हवे तसे हवे तेंव्हा ....वास्तवाचा गजर वाजवून उठून चालायला लावणाऱ्या ह्या मानवनिर्मित घड्याळाचे.

प्राण्यांच्यातलं ते स्थलांतराच घड्याळ सतत चालू राहिलच पाहिजे... निसर्गाच सुरेख चक्र कसं मस्त फिरत राहायलाच पाहिजे...  पण हे माणसाच्या स्थलांतराच मानवनिर्मित घड्याळ बंद करता येईल का? त्याला सतत चावी देणारे ते क्रूर हात कायमचे बांधता येतील का? .... कोणास ठाऊक ... होईल कधी तरी... थांबेल कधी तरी... माझा विश्वास आहे...अगाध विश्वास आहे.

***
प्रकाश केळकर 

Comments

  1. सुरेख लेख प्रकाश!

    ReplyDelete
  2. पक्या.. छान लेख...!

    ReplyDelete
  3. मस्त विषय आणि आशय दोन्ही छान

    ReplyDelete
  4. अतिशय छान आणी मार्मिक शब्दात लिहलं आहे. अभिनंदन

    ReplyDelete
  5. खूप छान मित्रा

    ReplyDelete
  6. Something different from you this time. That's good. Keep exploring new area.

    ReplyDelete
  7. Surekh lihilay ! Mojkya ani mafak shabdat barach kahi.. .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog