...लग्नाच्या शादीच वेडिंग....
 
रद्दी पेपर च्या गठ्ठ्यात एक जाडजूड पाकीट दिसल... कोणाची तरी लग्न पत्रिका...  सोनेरी मखमली वेलबुट्टी च्या अक्षरात लपेटून गोंडेदार रेशमी दोऱ्यात बांधलेली... पाच पानी आमंत्रण पत्रिका... " टाकू नकोस. राहूदे.छान आहे किती..." सौ ने अभयदान दिलेली ती पत्रिका मी तीच्या हातात ठेवली आणि निमूटपणे  उरलेली रद्दी टाकून आलो... .(खरतर रद्दी मागे ठेवून परत उपयोगी होणारे कागद टाकून आलो म्हणा!!.)
 
"अरे ,जयंत आणि निशी च्या सेजल च्या लग्नाची पत्रिका आहे ही.." ती आजून त्या बेगडी ५ पानातच गुरफटलेली...  " काय थाट केला रे त्यांनी ... ४ दिवसाचा कार्यक्रम , आधी संगीत , मेहेंदी , मग बारात, लग्न आणि शेवटच्या दिवशी ले मेरिडीयन ला कॉकटेल डिनर रिसेप्शन...काय धमाल आलीय म्हणून सांगू. ..तस होमहवन वगैरे पण केल म्हणा. सेजल च्या सासरच्याना हवे होते म्हणे सगळे आपल्याप्रमाणे विधी. "...  एकंदर, जयंत आणि निशी ह्या कुलकर्णी दाम्पत्याची ची. सौ. का. सेजल थाटामाटात लग्न होऊन सासरी गेली हे मला समजल.
 
वीस वर्षात काय झटापट बदल झालाय  सगळ्याच बाबतीत आणि लग्नाच्या सोहळ्यात पण... मंगल कार्यालयाची म्यारेज हॉल  आणि पार्टी लाँन झाली, "वधू" आणि "वर" पक्षाच्या खोल्यांना  "HIS" आणि "HER" च्या पाट्या मिळाल्या, होम हवनाला जास्त धूर न होणारी नवीन कुंडे मिळाली आणि बोहल्याचे रूप बदलून त्याचे शादी मंडप झाले. जेवणावळी पाटावरून उठून हातातल्या बुफे च्या थाळीत कधीच विसावल्या आणि आग्रहाचे जिलेबीचे ताट यजमानांच्या हातातून केंव्हाच वजा झाले.... लग्न लावताना गुरुजी पूर्वी घड्याळावर नजर ठेवून असायचे ते आता मोबाइल वर येणाऱ्या मेसेजेस वर लक्ष ठेऊन असणारे आणि शेवटचे " सावधान" म्हटल्यावर " वाजवा रे वाजवा " ऎवजी नवदाम्पत्याला "काँग्रॅच्युलेशन्स" करणारे .... "वाजवारे वाजवा" म्हणायला हल्ली संगीत आणि मेहेन्दीचा कार्यक्रम आसतो म्हणा. तिथे वाजंत्री च्या ऐवजी डी जे ला सांगायचे एवढाच फक्त फरक... आसो... कालाय तस्मय नमः.
 
लग्न घरी राहणे , लाडू चिवडा करणे , रुखवत बनवणे, पाटावरची पंगत, वाढप्यांची गडबड, आग्रहाचीवाढलेली जिलबी, कार्यालयात आदल्या रात्रीचा मुक्काम , वधु- वर पक्षाच्या खोल्या, ढेकुण वाल्या गाद्या, मोठी ट्रंक , त्यात ठेवलेल्या किमती जिनसा, ट्रंका सांभाळत कमरेला किल्ली लावून बसलेली आजी, मधूनच मुलीने नथ टोचते आहे म्हणून डोळ्याचे टिपलेले पाणी, खोलीतल्या नारळाची गोणी, चिवडा लाडू चे पत्र्याचे डबे, सनई चौघडा, गुरुजींचा उघडा बंब देह, मोठ्या आवाजात मंत्र आणि बोलणे, सर्वदूर पसरलेला होमाचा धूर, त्याने होणारी डोळ्याची चुरचुर, चढाओढीने म्हणालेली मंगलाष्टके, ती म्हणायला केलेला कोण्या आजीला आग्रह, पुडीत किंवा पाकिटात न देता सरळ हातावर दिलेल्या अक्षता, लाल पिवळ्या पतंगाच्या कागदात गुंडाळलेला पेढा..... लग्न म्हणाले कि एक न अनेक गोष्टी आठवतात.... पडद्याआड जात चाललेल्या... हरवलेल्या ...आता फक्त टी व्ही वर "उंच माझा झोका" सारख्या सिरियल मध्ये दिसणाऱ्या.!!
 
पाच पानी आमंत्रण पत्रिके मध्ये आता दीड दिवसाचा कार्यक्रम चार दीवसाचा आसतो... जास्त मजा , जास्त सोहळा, जास्त दिमाखात आणि थाटामाटात... पूर्वी आदल्या रात्रीच्या कार्यालयातील गाण्याच्या भेंड्या, कोण्या ताईने म्हटलेलं प्रेमळ भावगीत आता "संगीत" नावाच्या कार्यक्रमात बिदागी घेऊन कोणी गायक म्हणतो...  मेंदी साठी चे कोवळे गोरेपानं हात आता " मेहंदी " नावाच्या लग्नपत्रीकेतील कार्यक्रमात संगीताच्या साथीने रंगून जातात.... आणि मंगल कार्यातील महात्वाचा " लग्न" नावाचा सोहळा बोहोल्याच्या जागी असलेल्या " शादी मंडपात" साकार होतो....आणि शेवटी आग्रहाचे निमंत्रण ठराविकच लोकांना दिलेल्या कॉकटेल वेडिंग रिसेप्शन मध्ये ह्या पाच पानी सोहळ्याची सांगता होते...
 
प्रचंड दिमाखात आणि थाटामाटात पार पडणार, असं हे हल्लीच .. " लग्नाच्या शादीच वेडिंग".
 
***
प्रकाश केळकर

Comments

  1. Kharach June tech sone..surekh lekh��.. maja ali wachtana.rewind zale ekdam !

    ReplyDelete
  2. Can't complain about the changes but u have captured the new narrative aptly

    ReplyDelete
  3. मस्तच. अशाच लग्नात आणखी लग्न जुळायची म्हणतात.

    ReplyDelete
  4. Well described. Though obsolescence is too fast in all fields, the enjoyment continues. Only references are changed. Waiting for your next blog post. It's really interesting.

    ReplyDelete
  5. परिवर्तन लग्न सोहळ्याचं खूप छान रंगवलं आहेस
    प्रकाश असेच छान वाचंयला मिळत राहो

    ReplyDelete
  6. Everything changing....Just go on..Nicely put up.

    ReplyDelete
  7. Kharokhari perfect warnan kelas. Ti maja weglich hoti. . Anita Joshi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog