" राष्ट्रभाषा"….

" वो काटा हुवा कांदा और लसुन पहिले वाटो और फिर तेलपे परतो "… चहा चा पहिला घोट घेतला आणि तेव्हढ्यात आतून हे वाक्य कानावर पडलं. तोंडातला चहा फसकन बाहेर पडणार नाही इतक्याच बेताने हसलो पण तरी  तीला ते समजलच… " मग? कस सांगशील त्याला हे तुझ्या शुद्ध हिंदीत? सांग बरं " तिने आता माझी विकेट काढली.  मी पण आठवायचा प्रयत्न करत राहिलो " वाटो " आणि " परतो " ला खरा हिंदी शब्द शोधण्याचा.
राष्ट्र भाषा प्रचार समिती च्या प्राथमिक,प्रथमा,द्वितीय,तृतीया सगळ्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे मी. म्हणजे काय?  अहो, सार्टीफिकेट आहेत अजून घरी पुण्याला...माळ्यावरच्या ट्रंकेत.  थोडा टच गेलाय हल्ली इतकच. सापडेल पर्यायी हिंदी शब्दमनाची समजूत काढून आणि ऑफिस ला उशीर होतोय च्या नावाखाली मी बाथरूम कडे पळ काढला.... पण एव्हाना तिच्या हिंदीने फास्ट ट्रॅक पकडला होता…" आरे वो पंखा नीट पुसो रे बाबा , कितना काळा मिचकुट हुवा है"!!….आमचा भोजपुरी घरगडी हल्ली मराठी च्या  क्लासेस ला जायला लागलाय म्हणे ….कोणत्याही राजकीय पक्षाला घाबरुंन नव्हेहे हिंदी समजण्यासाठी !!! ... आणि आमचा कोपर्यावरचा दुकानदार. त्याला तर हिंदी मधला एकच शब्द येतो ... नाही! नाही!! खरंतर, दोन येतात... फोन वर ऑर्डर घेताना प्रत्येक वस्तू नंतर तो "sss " असं म्हणतो तो एक आणि सगळं झाल्यावर " आंsss बेजेगा " म्हणतो तो दुसरा...बस!!!...  पण त्याला ऑर्डर मात्र सगळी व्यस्थित कळते. हिने सांगितलेला " आच्छा टणटण वाजनेवाला नारळ " आणि " साल सोला हुवा मुंगफली " तो बरोब्बर पाठवतो.
मुंबई मधल बम्बैया हिंदी काय किंवा शुद्ध पुणेरी मराठी हिंदी कायइथून तिथून शेवटी व्यवहार आणि संवाद जमल्याशी मतलब ... मुंबई मध्ये पत्ता शोधणाऱ्या एखाद्या हिंदी भाषिकाला " किधर जायेला है? पवई नाका ? तो टॅक्सी वाला छोडेंगा ना! कायकु भेजेका दही करनेका ढुंढ के? " असं उत्तर ... किंवा पुण्यात तेच विचारणाऱ्याला " सदाशिव पेठ के अंदर गल्ली बोळ शोधनेका म्हणजे एक दिव्यच रहता है . विचार विचारके जाओ " असा सल्ला मिळतो. त्यातल्या त्यात हल्ली पुण्यातले बरेच रिक्षा वाले हिंदीत बोलणारेच आहेत त्यामुळे फारसं जड जात नाही म्हणा!!! ... पुण्यातल्या लोकांनाही फारसा फरक पडलेला नाहीये ... पूर्वी " शनिपारावर घ्या " असं सांगणाऱ्या काकू आता रिक्षावाल्याला " शनिपारपे लेलो" सांगतात एवढंच.
 इथे पुण्या सारख्या संस्कृतीरक्षक शहरात हल्ली मातृभाषेचेच  वांधे, तर राष्ट्रभाषेचे काय घेऊन बसलात??… ज्यांना "मराठी वर्डस रिमेम्बर करायला now a डेज जरा little बिट difficult जातं"  अश्या नवीन पिढीला हिंदी काय आन मराठी काय? सगळाच आनंदमधून मधून Bro आणि Man ह्या सर्वनामांची पेरणी असलेली त्यांची भाषा most cool आणि सध्याची in-thing आहेआजूबाजूची बोली भाषा तीच आपली राष्ट्रभाषा हे त्यांचे प्रमाणबाकी सर्व तसेही शब्दांच्या पलिकडलेच ही पिढी जास्त बोलते (आणि करते) म्हणा!!… असो.
एकंदर काय५० मार्कांचे हिंदी आणि ५० मार्कांचे संस्कृत असलेल्या आणि स्कोरिंग पुरत्याच  राहिलेल्या ह्या विषयांच्या  शालेय गोळाबेरजे मध्ये  राष्ट्रभाषेचे महत्व आम्ही १० % हरवलं आहे एवढ मात्र खर….!
…. जय हिंद.
*****
प्रकाश केळकर 

Comments

  1. हा हा.हा.... सही....

    ReplyDelete
  2. Mitra jabalpur athavale , aai khup suchana thokun dyayachi

    ReplyDelete
  3. This is funny situation in a sense. This convenient mixing has been there since my grand mother time, though on lesser scale in nashik. I don't know how long it takes for a language to die or it just evolves for that area.

    ReplyDelete
  4. Hahaha!! Bilkul sahi farmaya! Amhi asach bolto.. Mhanje woh taak hai na usko jara dhawal dhawal ke piyo wagaire 😂mhanun blog khup awadla

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog