पाऊस , पाऊस... आणि पाऊस.
कणिस भाजल्याचा नुसता वास आला तरी पाऊस पडतोय बाहेर असं वाटत.... पावसाचं हे समीकरण भजी, आल्याचा वाफाळता चहा, भाजलेले शेंगदाणे, लिंबू मीठ लावलेल कणिस, न वाळलेली जीन्स, प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल पैशाचं पाकीट, दमट भिंतीचा वास, बुटाच्या आत ओले राहिलेले मोजे, पत्र्यावरच्या थेंबांचा आवाज, गळणाऱ्या पागोळ्या, गोगलगाई आणि अश्या अनेक वस्तू आणि आठवणींशी बांधलय ... तो मृदगंध वैगरे सगळं दुय्यम... नंतर येतो तो लिस्ट मध्ये.
लहानपणी आई आजी वगैरे मंडळी लोणच्या मिरच्यांच्या बरण्याना उघडून त्यांना तेल फोडणी आणि नीट बांधणी करायला लागल्या, आणि डाळी तांदुळाच्या डब्यांमध्ये काहीबाही गोळ्या पावडरी घालून नीट बंद करू लागल्या, कि समजायचं पावसाळा जवळ आलाय.... उन्ह्याळी सुट्टीवर कोकणात थोड उशिरा पर्यंत रेंगाळलं कि कातळावर तुरुतुरु चालणारे मृगाचे तांबडे लोकरी किडे दिसायचे आणि मग पावसाची चाहूल लागायची. ह्या किड्यांच्या आगमनान मिळणार पावसाचं रि-कन्फर्मेशन म्हणून नंतर हवामान खात्याची पेपर मधली बातमीहि वाचायला मिळायची.
ही पावसाळ्याची सुरुवात मला मात्र नेहमी हुरहूर लावून जायची. जाणीव करून द्यायची... आता शाळा सुरु होणार आणि मज्जा करायचे दिवस संपले. दावणीला जुंपायला नेताना दिसणारे गुरांच्या डोळ्यातले भाव नेमके अश्या वेळी माझ्याही डोळ्यात तरळत असणार. मोठ्ठा उसासा टाकून कोपऱ्यात पडलेल दप्तर शोधायचा मग एक कार्यक्रम असायचा. नवीन आणलेल्या पुस्तकांना कव्हर घालणे आणि गेल्या वर्षीच्या वह्यांमधली कोरी पाने फाडून त्याची रफ वही करण्याचा उद्योग सुरु व्हायचा. सुट्ट्टीवर असताना कोकणात केलेल्या गमती जमती आठवत ह्या वर्षभराच्या शाळेत जाण्याच्या नुसत्या विचारांच्या ओझ्याने दबून गेलेला जीव मग पावसाची वाट पाहत बसायचा... शाळेच्या पहिल्या दिवशी धो धो पडेल... आणि शाळेला सुट्टी मिळेल ह्या एकाच आशेवर.
पावसाळ्याची ही एक निराश करणारी बाजू सोडली तर बाकी सगळं उल्हसित करणारं.... आई बरोबरच्या रेनकोट खरेदी पासून ते पहिल्या पावसात भिजण्या पर्यंत. शाळेच्या पहिल्या दिवशी पावसाने मारलेली दडी शाळा चालू असण्याच दडपण आणायची. पण पहिल्याच आठवड्यात जोरदार झडलेल्या धुमश्चक्री पावसाने शाळेत येऊ न शकलेल्या वर्गशिक्षिकेच्या गैरहजेरींन रिकाम्या तासाच्या उधाणात ते दडपण विरून जायचं. आणि हळू हळू थेंबे थेंबे साठत गेलेल्या धरणाच्या पाणवठ्या सारखं नवीन वर्षाच्या उल्हासाचं तळ काठोकाठ भरून जायचं. पावसात साठलेल्या पाण्यात सायकल हाणत शाळेत जायला मन उतावळ व्हायच आणि पाणी भरल्या ग्राऊंडवर कधी एकदा खेळायला जातोय ह्या ओढीनं तेवढच संध्याकाळी घराकडे धावायचं.
ह्या धावपळीत बरीच वर्ष सटासट मागे पडली. पावसाच्या आणि पावसाळ्याच्या ओढीची कारणंहि बदलली... मग सुरु झाले पावसाळी ट्रेक , वडापाव, कट्ट्यावर चहा आणि चार जणात फिरणाऱ्या एका गोल्डफ्लेकचे दिवस ...मोटरसायकल वरून छातीवर बेफाम वारा पाऊस झेलत रोरावत जाण्याचे दिवस... मागे कोणी बसली असेल तर तिच्या हलक्या आवाजातली कुजबुज कानात साठवत पावसात हुंदडण्याचे दिवस... ह्या दिवसांमध्ये कसलच दडपण नव्हतं... हुरहूर असायची ती मात्र पावसाळा संपेल आणि हे क्षण झेलायला एक वर्ष परत थांबावं लागणार ह्याची... वक्त वक्त कि बात!
अजूनही पावसाळा सुरु झाला की काही वेगळं वाटतं... बातम्यान मध्ये दिसणारी पावसाची दृश्य पाहून मग पुन्हा त्या सगळ्या वर्षांची फिल्म फास्ट फॉरवर्ड मध्ये डोळ्यासमोर उलगडते. पाण्यात सोडलेल्या होड्यांपासून , चिखलपाणी च्या खेळापासून , रेनकोट मध्ये लपवून घरी आणलेल्या रस्त्यावर सापडलेल्या भिजलेल्या कुत्र्याच्या पिल्ला पासून ... ते... हिरवाईत स्वछंद बागडलेल्या , तरुणाईच वारं पिऊन बेफाम उधळलेल्या दिवसांपर्यंतचे सगळे क्षण सुखावून जातात...
ह्या अश्या क्षणी मग कधी तरी पावसातच सुचलेली कविता माझी मला पुन्हा आठवते ... आणि जीव ओला होतो... !!!
पाऊस पाऊस
.... सर्वदूर पाऊस
काचेवर, छपरावर,
दाराबाहेर, अंगणात
पागोळ्यातून उतरतो पाऊस...
भिंतीवरील आेलाव्यात
पायरीवरील शेवाळ्यात
गोगलगाईवरून निथळतो पाऊस...
चहातल्या वाफेनं
चष्म्यावर धुकटून
भाज्यांच्या कढईत
चरचरत उतरतो पाऊस...
रेडीओवरील गाण्यातील
सिनेमाच्या पोस्टरवरील
माधुरीला भिजवतो पाऊस...
भिजलेल्या कुत्र्याच्या अन्
कोपर्यावरील भिकार्याच्या
डोळ्यातून दिसतो पाऊस...
उबदार घरातला
दुलईत लपेटलेला
माझ्या उरात राहतो पाऊस...
पाऊस पाऊस
सर्वदूर फक्त ,
पाऊस, पाऊस अन् ... पाऊस.
***
प्रकाश केळकर
🙌
ReplyDeleteखुपच छान लेख
ReplyDeleteपाऊस... कोसळणारा,बरसणारा,हलक्या सरी...अशा अनेक रुपांत तो भेटतो...हो भेटतोच..अतिवृष्टीने बंद होणाऱ्या लोकल्स् आणि मग मैत्रिणींबरोबर पावसात हुंदडत मज्जा करायची.प्रचंड आवडतो पाऊस.. किती छान लिहीलंयस
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteवा खूप छान! परत एकदा चिंब भिजलो आम्ही तुझ्या आठवणींच्या पावसात.
ReplyDeleteसुंदर लिहिलेस प्रकाश....
ReplyDeleteएकदम मस्त
ReplyDeleteWah ! Masta chitra ubha rahila ! Shaletle diwas ani paosachi dhamal! ! Surekh lihilay.
ReplyDeleteMe kadhi koknat nahi gele. Pan tuzhya likhanatun konknat pherphatka marun aale. Khup masta lihila ahes. Pavsala ha mazha sarvat avdta rutu ahe. Shala suru honar tyachi tayari. Hey sagla dolya samoroon gela. Shalet astana khup paus padla ki sutti milaychi to sarvat avadta divas ase , karan mug pavsat manasokta bhijta yeycha.
ReplyDeleteKhup chaan
प्रकाश तुझ्या लिखाणानी तसही teleportation होतच. पण हा तर खासच आहे. कमालीची लयबद्ध बांधणी, चपखल उपमा आणि भिडणारे शब्द... वरचा क्लास.
ReplyDeleteमस्त रे मित्रा
ReplyDeleteWonderfully described...too good!!
ReplyDeleteधन्यवाद रसिक वाचकहो... धन्यवाद.
ReplyDelete