८ दिवस, ४ जागा, काही अनुभव आणि विचार....
प्राग (झेक रिपब्लिक) - २०/०८/२०१८
गाडी ने आता चांगलाच वेग पकडला होता... आजूबाजूला पसरलेल्या कुरणांमध्ये पिवळ्या गवताची नीटस बांधलेली भेंडोळी विखुरलेली होती...हिरव्या दाट जंगलांचे पुंजके कुरणांच्या कडेकडेने रांगोळीतल्या हिरव्या रंगा सारखे भरलेले... त्यात मधूनच डोकावणारी चर्चेस ची शिखरे, छोट्या टुमदार गावांची, घरांची ठिपक्यांची सुबक नक्षी आणि आरश्याचा तुकडा ठेवल्यासारखा एखाद दुसरा गोंडस तलाव... खिडकी बाहेरचे ते धावणारे दृश्य बघण्यात माझे डोळे व्यस्त होते पण कान मात्र रॅडिकच्या , आमच्या ड्राईवरच्या मधूनच होणाऱ्या स्वतःच्या बडबडीकडे. तो मधूनच उसासे सोडत होता, कधी उपहासाने हसत होता, तर कधी शिवी सदृश्य प्रतिक्रिया फेकत होता. हे सगळं त्याच चाललं होत रेडिओ वर चालू असलेलं कसलं तरी थेट प्रक्षेपण ऐकत... बाहेरच्या धावणाऱ्या जगाकडे लावलेली नजर वळवून मी रॅडिकला न राहावून विचारल, " काय ऐकतोयस तू?" ... " विन्सेंलास स्क्वेअर मधल आमच्या पंतप्रधानांच भाषण... लोकांना ते फारसे आवडत नाहीये आणि म्हणून ते हुर्ये उडवतायत आणि बोलू देत नाहीयेत... " तो हसत हसत उत्तरला... प्राग वर झालेल्या आक्रमणाचा ५० वा वर्षदिन होता आणि विन्सेंलास स्क्वेअर मध्ये चालू असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण चालू होत. एक काळा दिवस तो... मी रॅडिकला बोलत केलं. आणि रेडिओ चा आवाज बारीक करून तो पुढचे २ तास त्याच्या देशाचा, पूर्वजांचा, आई वडिलांचा आणि त्या " डार्क इयर्स" चा करडा इतिहास सांगू लागला... " अन्याय झाला खूप " हे वाक्य अंडरस्टेटमेन्ट ठरेल आश्या काही गोष्टी सांगत एका सुधारणावादी समृद्ध देशाच्या तडा गेलेल्या आरशात मला त्याने ते बिन चेहेर्याचं प्रतिबिंब दाखवल... त्याच्या आधीच्या २/३ पिढ्यानी काय आणि कसं सहन केलं हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर राग,चीड, कणव, भीती,उद्वेग, आवेग, ईर्षा आणि अपेक्षा असे संमिश्र भाव मला एखाद्या करड्या पडद्यावर घडणाऱ्या युद्धपटा सारखे दिसत राहिले...त्याने गाडी आणि बडबड पेट्रोल स्टेशन वर एकदम थांबवली आणि मी भानावर आलो... पेक्षा, थोडा विचारात गुरफटलो... आफाट जगण्याची जिद्द आणि त्यावरचं प्रेम माणसाला कशा कशावर मात करायला ताकद देतं... नाहीका?... शहरात पाहिलेल्या त्या वॉर हिरो मेमोरियल पेक्षा ह्या अचाट जिद्दी लोकांचं एक मेमोरियल कुठे तरी उभं करायला हवाय. प्राग मध्येच ऐकलेली एक गोष्ट आठवली... वलतावा नदीला काही वर्षांपूर्वी महापूर आला होता तेंव्हाची सत्यकथा... प्राग च्या प्राणी संग्रहालयात पाणी शिरलं. बरेच प्राणी त्यात दगावले, काहीना वाचवण्यात यश आल... संग्रहालयातील एक गेस्टन नावाचा सील धडपडत त्याच्या पिंजऱ्यातून कसाबसा बाहेर पडला आणि तटबंदीवरुन उडी मारून महापुरात त्याने स्वतःला झोकून दिलं... बघता बघता तो पुराच्या प्रवाहात दिसेनासा झाला. रेस्क्यू करणार्यांनी आशा सोडली... पण हा पट्ठ्या तब्बल शेकडो मैल त्या पुरात पोहत लांब नदीच्या प्रवाहात नॉर्थ समुद्राच्या दिशेने पोहत वाहत गेला... शेवटी तो जर्मनी मध्ये कुठेतरी प्रवाहात सापडला आणि त्याला तेथे किनाऱ्यावर आणलं गेलं... जिवाच्या आकांताने अनेक दिवस पुरात पोहत गेलेल्या, दमलेल्या त्या सीलचे प्राग झू मध्ये परत आणे पर्यंत प्राण मालवले... त्याचं स्मृतिस्थळ आणि चिंन्ह आजही प्राग झू मध्ये पाहायला मिळतं... बंदिवासातून, पुराच्या पाण्यात स्वतःला झोकून देऊन मुक्ती मिळवलेल्या त्या जगण्यावर अफाट प्रेम असण्याऱ्या जीवाला सलाम... रॅडिक ने माझ्यासाठी कथन केलेल्या इतिहासानंतर हि गोष्ट मी आता कधीच विसरणार नाही!!!
झेस्की कृमलोव्ह ( झेक रिपब्लिक) - २१/०८/२०१८
सुशेगात !!! ... करेक्ट, हाच शब्द योग्य आहे ह्या टुमदार गावा साठी. सगळं कस निवांत. अगदी गोव्याची आठवण करून देणारा गाव.... फेणी आणि सर्पोतेल ची आठवण झाली कि शांत पणे दुकान बंद करून आलेल्या गिर्हाईकाला परतवणारा गोवेंकर आणि अचानक आपल्या बिअर आणि गुलाश ची आठवण झाल्यासारखा माझ्या तोंडावर दार बंद करून निघून जाणारा झेस्की मधल्या कॅफे चा स्थितप्रज्ञ मालक ... दोन्ही एकाच माळेचे मणी. अशी कसलीच घाई नसणारी गावं नेहमी जवळची वाटतात. झेस्की कृमलोव्ह च्या त्या युनेस्को ने वर्ल्ड हेरिटेज म्हणून जाहीर केलेल्या जुन्या गावा बाहेर एक नवीन शहर पण आहे ह्याची कोणतीही जाणीव इथे राहण्याऱ्याला नाही आणि कधी ती आपल्याला जाणवतही नाही. युरोप मध्ये गेल्या कित्येक शतकात जे काही घडलं त्याचा इथे मागमूस नाही असं उगीचच वाटत राहातं.... शांत वाहणारी वर्तुळाकार नदी , त्यामध्ये वसलेली पांढऱ्या पिवळ्या भिंतींची आणि तांबूस मातकट कौलारू घरांची वस्ती , लाकडी पुलावरून पाण्यात दिसणारा चॅपेल चा कळस आणि पाठीमागे टेकडी वर सुंदरसा उंच मनोऱ्याचा नीटस दारा खिडक्यांनि सजलेला रंगबिरंगी कॅसल... लहानपणी पाहिलेल्या दोन पानांच्या मध्ये उलगडणार्या रंगीबेरंगी कट आऊट चित्राच्या परीकथा पुस्तका सा रखा दिसणारा गाव...
रात्री च्या थंड शांत वेळी मधल्या चौकात तो बसला होता...हातातल्या गिटार वर छेडणाऱ्या तारांच्या आणि पायाला बांधलेल्या छोट्या घुंगरांच्या ठेक्यावर त्याच मस्त धुंद स्वछंदी गाणं चाललं होतं ... सभोवती बसलेल्या श्रोत्यांना कसलीच घाई नव्हती... अठरापगड जाती जमाती धर्म वेष देश विचार आचार असलेल्या त्या श्रोतुवृन्दा मध्ये कसलाच तणाव नव्हता, चिंता नव्हती... गाणारा गळा सुरेल होता , तारा छेडणारे हात बरोब्बर स्वरांचा वेध घेत होते , ठेक्यात झुलणारे पाय ताल आणि लय धरून होते आणि तो सगळा स्वर्ग कणाकणात,रोमारोमात टिपून घेणारे कान तृप्त होत होते... माझ प्रेम बसलं झेस्की वर.!!!
व्हिएन्ना ( ऑस्ट्रिया) - २३/०८/२०१८
" बुडापेस्ट ला जाणारी जलद गाडी फलाट क्रमांक ५ वरून सुटेल" ... अशी लाऊडस्पिकर वर काही सूचना नाही , सगळे प्रवासी कसे निमूटपणे ( कंडक्टर बरोबर हुज्जत न घालता) रांगेत उभे... " अल्लेsssपाsssक, सेंगदाने , लेमन गोळी " अशी आरोळी नाही ... वडापाव आणि इतर कसलाच वास नाही ... गर्दी नाही गोंगाट नाही ... उसाच्या गुऱ्हाळातला घुंगरांचा आवाज नाही ... सोडा वॉटर बाटल्यांचा चित्कार नाही... ह्यॅ ! हा काय बस स्टॅन्ड ए ??? काही दम नाही ह्या प्रवासात ... असा विचार करत मी बस मध्ये शिरलो आणि त्या भयाण शांततेत निद्राधीन झालो...आणि गेल्या दोन दिवसांचे व्हिएन्ना मधले क्षण मोझार्ट च्या सिम्फनी सारखे मिटल्या डोळ्यासमोर गुंजायला लागले.
नॅशनल लायब्ररी ... व्हिएन्ना मधली सगळ्यात आवडलेली जागा ... २ लाखांच्या वर पुस्तकांचा संग्रह असलेल जगातील सर्वात जून पुस्तकालय. व्हीएन्नात पाहिलेल्या इतर बऱ्याच भव्य दिव्य इमारती आणि स्थळांमध्ये मनात कायमची बसून गेली हि एक जागा... शेकडो वर्षांच्या पुस्तक संग्रहात, अगदी जगात निर्माण झालेल्या पहिल्या काही छापील पुस्तकांचा समावेश असलेले हे अद्भुत पुस्तकालय. त्याची सुबक मांडणी, अत्योत्तम सजावट आणि छतावरील सुयोग्य रेखाटलेली चित्र... ऑस्ट्रिया च्या कला शास्त्र साहित्याने समृद्ध आश्या इतिहासाची जणू एका जागेत होणारी हि ओळख... धन्य ते राजे महाराजे, पुस्तकप्रेमी सरदार, जहागीरदार ,ग्रंथालयाचे निर्माते, क्युरेटर्स... काही शतकांमागे लागलेल्या युद्धाच्या आगीत सगळ्या पुस्तकांना प्राणाच्या पलीकडे सांभाळत वाचवणारे धान्य ते सारे पुस्तकप्रेमी आणि ह्या सगळ्याचा तेवढ्याच प्रेमाने सांभाळ करणारे सध्याचे कामगार... पुस्तका संदर्भात म्हणलं जातं कि " जो ते विकत घेतो,राखतो तो मूर्ख आणि जो ते उसने घेतो तो शहाणा" ... पण ते इथे हे खोट ठरतं हे नक्की!!! ... का कोणास ठाऊक... व्हिएन्नाचं हे सुरेख जपलेलं पुस्तकालय पाहिल्यावर मला आपल उगीचच काही वर्षा पूर्वीचा पुण्यातला एक निराशजनक प्रसंग आठवला... जुन्या ग्रंथसंग्रहालयात तोडफोड आणि दुर्मिळ ग्रंथाना आग लावली गेली होती त्याचा... असो!!!
बुडापेस्ट ( हंगेरी) - २४/०८/२०१८
समजा, पुण्यात एखाद्या जुन्या वाड्यात नवीन सजावट करून एखादा बार सुरु झाला!!! तर? ... फक्त विचारांनीच अंग चोरलं गेल ना? चालायचंच ... आपली संस्कृती नाही ती.
तर हा विचार मनात डोकावण्यामागे बुडापेस्ट कारणीभूत झालं... हो ! त्या २० लाख वस्ती च्या भव्य ऐतिहासिक वास्तूंच्या महानगरातील गल्ली बोळातुन फिरता फिरता रुईनड बार नावाच्या भन्नाट जागांना भेट देण्याचा योग आला... जुन्या मोडकळीस आलेल्या घराच्या अंगणात , सोप्यात, माडीवर, परसात , बागेत आणि खोल्या खोल्यां मध्ये वाट्टेल त्या वस्तूं वापरून स्वछंदी सजावट केलेल्या ह्या बार मध्ये गेल्यावर मदिरामंदीर म्हणजे नक्की काय ह्याचा शोध लागला...तिथे काय मिळतं, काय खायचा? काय प्यायचं? ह्या पेक्षा ह्या जुन्या पडक्या वस्तूचा सुंदर उपयोग करून ती जपता कशी येते हा विचार भावतो... ह्या रूईनड बार्स ना भेट देणारे टुरिस्ट चे जत्थे पहिले कि ह्या "जपण्याचं" महत्व जास्त समजतं.
खरं तर जुनं ते सोनं असं समजणारी आपली संस्कृती... जुने वाडे पडताना हि संस्कृती त्या धुळीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली ... त्यामुळे ती संस्कृती आता फक्त एका म्हणीच्या रूपात राहिलीय...आणि उरलीय ती फक्त ऐतिहासिक जागांवर स्वतःच आणि प्रेमिकेचं नाव मध्ये बदाम दाखवून कोरण्याची कला... आपल्या जुन्याची राख करून दुसऱ्याच्या जुन्याचं झालेलं,त्यांनी जपलेलं सोनं बघण्याचं आपल्या नशिबी राहिलाय आता... बुडापेस्ट ला जरूर भेट द्या !!! ह्या जुन्याच्या केलेल्या सोन्याची खाण सापडेल तिथे.
***
प्रकाश केळकर
झकास....👌
ReplyDeleteएक नंबर 🙏
ReplyDeleteBhari!!
ReplyDeleteMastach
ReplyDeleteप्रकाश हा तुझा सर्वोत्तम लेख .
ReplyDeleteमंजू
मित्रा तिकडे गेल्यासारखेच वाटतेय
ReplyDeleteVery nice Prakash..
ReplyDeleteआवडलं
ReplyDeleteTook me there all the way!! Without ticket and without visa!!
ReplyDeleteKhup chan👌
ReplyDeleteExcellent Prakash!...your flair for writing these wonderful travelogues...a compilation worth publishing!...I will be the first buyer :-)
ReplyDeleteLot of information collected and compiled, written nicely
ReplyDeleteअरे सुरेख प्रवास वर्णन करतोस तू.प्रत्यक्ष फिरवून आणलंस.हे खरं फिरणं.मस्त.गेस्टन सील एकदम स्फूर्तिदायक. सुरेख!
ReplyDeleteकाय सुंदर लय पकसली आहेस मस्त
ReplyDeleteChan lekh Prakash!!
ReplyDeleteधन्यवाद रसिक वाचकहो... धन्यवाद.
ReplyDeleteबऱ्याच दिवसांनी शांतपणे वाचायला वेळ मिळाला. मजा आली वाचायला... प्रत्येक ठिकाणात दडलेली story तू मस्त decipher केली आहेस...
ReplyDelete