हे जगणं एकदाच येतं ... 

नेहमीच्या आवडत्या नाॅस्टॅलजीयाला, भूतकाळाला छेद देवून जरा वास्तवाचा वेध घ्यावासा वाटला म्हणून हा विचार मांडायचा आज प्रयत्न... 

घाबरू नका!!!....  कोणत्याही फिलाॅसाॅफीचं गंध सहाणेवर उगाळणार नाहीये किंवा आयुष्यावर बोलू काही म्हणून त्याचं धुणही पिळणार नाहीये... काही दिसलं, जाणवलं , मनांत आलं ...म्हणून.

सकाळचा नित्यक्रम म्हणून वर्तमानपत्र हातात घेतल्यावर पॉसिटीव्ह बातम्यांचा शोध घेण्याच्या धडपडीत साऱ्या निगेटिव्ह बातम्या नजरेस पडतात आणि त्यातही काही मथळे जास्तच अस्वस्थ करून जातात... 

एकीकडे दोन दोन आठवडे जगण्याच्या उत्कट प्रबळ इच्छेवर तग धरून खोल गुहेत जीव मुठीत घेऊन बसलेली ती थायलंड मधली चिमुरडी आणि दुसरीकडे निराशेच्या गर्तेत अश्याच खोल गुहेत अडकलेल्या विद्यार्थ्यांची आत्महत्या करण्याची वाढणारी मानसिकता... एकीकडे दुर्दम्य आजारावर  धीरोदात्तपणे मात करण्याची जिद्द तर दुसरीकडे कसलाच आजार नसताना आयुष्यात करण्यासारख काहीच राहिला नाही आणि भविष्यात संभवणाऱ्या वार्धक्याच्या आजारपणाला  घाबरून वयोवृद्ध जोडप्याने केलेली इच्छामरणाची याचना.... काहीतरी सेन्सेशनल करायच, वेगळ करायच म्हणून चळवळीला पाठिंबा देण्यास आत्मसमर्पण करायला तयार झालेले तरुण आणि दुसरीकडे शत्रूच्या गोळ्यांनी देहाची चाळण झाली असली तरी देशाच्या हितासाठी सुरक्षेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत शौर्य आणि प्राण पणाला लावून आत्मबलिदान करणारे आमचे सैन्यातील वीर... 

ह्या आत्महत्येच्या, आत्मदहनाच्या, आत्मसमर्पणाच्या बातम्या वाचल्या कि वाटतं काही तरी कुठे तरी कमी आहे... फार फार कमी आहे... आणि दिवसेंदिवस ते जास्तच कमी कमी होत जातंय .... काय कमी पडतंय म्हणून हा जीवन संपवण्याची भाषा करणारा कमकुवत मनाच्या लोकांचा समूह वाढतोय? ... आपणच कदाचित काही चुकीचं किंवा हव तेवढं बरोबर करत नसूं बहुतेक...

जगण्याचं महत्व त्यांना एवढ अचानक एकदम क्षुल्लक का वाटावं? मान्य आहे प्रत्येकालाच सुख समृद्धी भरभरून वाट्याला येत नाही. प्रत्येकाचं दुःखहि वेगळ , यातना, वेदना ,निराशा वेगवेगळ्या... सुखाच्या मागे दुःख काही जण सहज दडवू शकतात तर काही दुःखाचीच फक्त झालर लावून त्या मखरात बसतात. पण तरी हा टोकाचा विचार, जगणं संपवण्याचा विचार त्यांना का सुचतो?... कदाचित त्यांना कोणी सांगणारं भेटत नाही... योग्य वेळी, क्षणी आणि घडणाऱ्या वयात.

शाळेमध्येच खरं तर अभ्यासाच्या तासाबरोबर एक ह्या विषयीचा तास हवाय. जगणं किती सुंदर आहे आणि ते एकदाच येतं हे समजावून आणि मनावर बिंबवण्यासाठी लहान वयातच प्रयत्न करायला हवाय... आशा आहे, एक दिवस असा येईल कि जीवन संपवायचा विचार काय असतो ह्याचाच विसर मानवाला पडेल... आत्महत्या हा शब्दच अस्तित्वात नसेल  ... आणि देवानं दिलेल्या ह्या सुंदर जगण्याला खरा अर्थ लाभेल. 

स्वतःच्या आणि इतरांच्या जगण्यावर आत्यंतिक प्रेम असणाऱ्या माणसांच हे एकच सांगणं...मनापासून...माझ्या काव्यामधून :

                हे जगणं एकदाच येतं... 
                             राहा पुरेपूर जगून
                              स्वता:साठीमनासारखं,
                                 अन् देण्यासाठी आनंद
                               आपल्या ओंजळीत भरून.

                 हे जगणं एकदाच येतं... 
                                राहा सुगंधी होवून
                                बकुळीच्या फुलासारखं,
                                   अन् देण्यासाठी गंध
                                   गेलात जरी सुकून.

                  हे जगणं एकदाच येतं... 
                                   राहा सुरेल बनून
                                रंगलेल्या मैफिलीसारखं,
                                   अन् देण्यासाठी त्याला दाद 
                                   जे गाण येत जमून.

                 हे जगणं एकदाच येतं...
                 ...फक्त एकदाच येतं!... एकदाच येतं. 

  ***
  प्रकाश केळकर. 

Comments

  1. वा प्रकाश, तोडलंस मित्रा... भारी जमलंय!

    ReplyDelete
  2. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे....

    ReplyDelete
  3. कमाल.. प्रखर वास्तव अगदी सरळ मांडलंय. पण खरंच आत्महत्येचा विचार करणण्याची वेळ येते ह्याचाच दुसरा अर्थ माणूस एकटा पडतोय, किंवा एकमेकांना समजून घेण्यात कमालीची उदासीनता आहे.काहीच सुरक्षित नाही. खूप सुंदर आणि विचार करायला लावणारं लिहीलंय.

    ReplyDelete
  4. कमाल.. प्रखर वास्तव अगदी सरळ मांडलंय. पण खरंच आत्महत्येचा विचार करणण्याची वेळ येते ह्याचाच दुसरा अर्थ माणूस एकटा पडतोय, किंवा एकमेकांना समजून घेण्यात कमालीची उदासीनता आहे.काहीच सुरक्षित नाही. खूप सुंदर आणि विचार करायला लावणारं लिहीलंय.

    ReplyDelete
  5. कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात येणाऱ्या भावना तू फारच उत्तम रित्या मांडल्या आहेस। सुंदर

    ReplyDelete
  6. वा!! शाळेत "जगणे किती सुंदर आहे" हा विषय शिकवण्याची कल्पना खरच छान आहे. अगदी तसे शक्य नसले तरी घरा घरातून हे संस्कार नकळत होताच असतात.हेच संस्कार मैत्रीच्या धाग्यातून दृढ होत असतात . म्हणून प्रत्येकाला एक तरी चांगला मित्र असावा जो एकमेकांना आनंदी जगण्याचं गुपित सांगेल.

    ReplyDelete
  7. Replies
    1. Positivity is key to life. Must start at school. Chan lihile aahes.

      Delete
  8. Masta jamlay ! Very true if only schools taught what makes life an amazing journey . .

    ReplyDelete
  9. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे
    शतदा प्रेम करावे ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog