
८ दिवस, ४ जागा, काही अनुभव आणि विचार.... प्राग (झेक रिपब्लिक) - २०/०८/२०१८ गाडी ने आता चांगलाच वेग पकडला होता... आजूबाजूला पसरलेल्या कुरणांमध्ये पिवळ्या गवताची नीटस बांधलेली भेंडोळी विखुरलेली होती...हिरव्या दाट जंगलांचे पुंजके कुरणांच्या कडेकडेने रांगोळीतल्या हिरव्या रंगा सारखे भरलेले... त्यात मधूनच डोकावणारी चर्चेस ची शिखरे, छोट्या टुमदार गावांची, घरांची ठिपक्यांची सुबक नक्षी आणि आरश्याचा तुकडा ठेवल्यासारखा एखाद दुसरा गोंडस तलाव... खिडकी बाहेरचे ते धावणारे दृश्य बघण्यात माझे डोळे व्यस्त होते पण कान मात्र रॅडिकच्या , आमच्या ड्राईवरच्या मधूनच होणाऱ्या स्वतःच्या बडबडीकडे. तो मधूनच उसासे सोडत होता, कधी उपहासाने हसत होता, तर कधी शिवी सदृश्य प्रतिक्रिया फेकत होता. हे सगळं त्याच चाललं होत रेडिओ वर चालू असलेलं कसलं तरी थेट प्रक्षेपण ऐकत... बाहेरच्या धावणाऱ्या जगाकडे लावलेली नजर वळवून मी रॅडिकला न राहावून विचारल, " काय ऐकतोयस तू?" ... " विन्सेंलास स्क्वेअर मधल आमच्या पंतप्रधानांच भाषण... लोकांना ते ...